‘मटार’ महाग दिल्याच्या रागातून भाजी विक्रेत्याचा निर्घृण खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याचा परिणाम भाज्यांवर झाला आहे. अवकाळी पावसामुळे भाज्यांने नुकसान झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत. यातच, मटार जास्त भावाने विकत असल्याच्या रागातून एका ग्राहकाने भाजी विक्रेत्याचा खून केल्याची घटना मानखुर्दमध्ये सोमवारी घडली. या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी अभिषेक धुमाळ (वय-22) आणि साहिल खराडे (वय-19) दोघांना अटक केली आहे.

मानखुर्द रेल्वे स्थानकाच्या बाहेर सायन-पनवेल हायवे ब्रिजखाली रामखिलान यादव (वय-30) हा भाजी विक्रेता भाजी विकत होता.यादव याने मटारचे छोटो-छोटे वाटे करून ते 10 रुपयांना विक्रीसाठी ठेवले होते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास धुमाळ आणि खराडे त्या ठिकाणी आले. त्यांनी मटारचा वाटा घेऊन आणखी मटार टाकण्यास सांगितले. मात्र भाजी महाग असल्याचे सांगत यादव याने आणखी मटार देण्यास नकार दिला.

जादा दराने मटार विकत असल्याचा राग आल्याने दोघांनी यादवसोबत हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यांच्यातील शाब्दीक बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. दोघांनी यादवला बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी होत बेशुद्ध झालेल्या यादवला स्थानिकांनी जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यादव याच्या पत्नीने तक्रारीनंतर घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी धुमाळ आणि खराडे यांचा शोध घेत त्यांना अटक केली. तपासादरम्यान दोघेही आंबेडकर नगरमध्ये रहात असून ते दोघे मामा-भाचे असल्याचे समोर आले. पुढील तपास मानखुर्द पोलीस करीत आहेत.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like