व्यापाऱ्यांची संकल्पना : टेम्पोमधून भाजीपाल्याची थेट दारात विक्री, सोसायट्यांमधील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसच्या संसर्ग टाळण्यासाठी भाजीमंडईमध्ये भाजीपाल्याची विक्री न करता हडपसरमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन टेम्पोमधून थेट सोसायट्या आणि नागरिकांच्या मागणीनुसार भाजीपाला विक्री सुरू केला आहे. प्रभाग क्र.22, 23, 24 आणि 26 या चार प्रभागामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेत नागरिकांना रास्त भावात भाजीपाला उपलब्ध करून दिला जात आहे. त्यामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे.

हडपसरमधील पंडित जवाहरलाल भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम सुरू केला आहे. त्याला नगरसेवक योगेश ससाणे यांनी मदत दिली आहे. भाजी विक्रीसाठी 10 टेम्पोमध्ये पालेभाज्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत ही सेवा नागरिकांना दिली जात आहे. प्रभाग क्र.22, 23, 24 आणि 26 या परिसरामध्ये विक्रीसाठी जात आहेत. एका टेम्पोमध्ये चार व्यापारी कार्यरत आहेत. सोसायट्या आणि बैठ्या चाळीमध्ये टेम्पो भाजी घेऊन जात असून, नागरिक रांगेत भाजी खरेदी करीत आहेत. भाजीमार्केटपेक्षा कमी भावात स्वच्छ आणि ताजा भाजीपाला मिळत असल्याचे काही नागरिकांनी सांगितले.

कोरोना व्हायरस संसर्गाने प्रत्येकाच्या मनामध्ये भीतीचे सावट घोंगावत आहे. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, भाजी खरेदीसाठी चाललो आहे, हे सांगण्यासाठी पोलिसांना विनवण्या कराव्या लागत आहेत. त्यापेक्षा आम्हाला ताजा आणि स्वच्छ भाजीपाला दारात मिळत आहे, अशीच भावना सामान्यजणांनी व्यक्त केली. वाहन नको, गर्दी नको, लांब थाबायला नको, एकमेकांबद्दल संशयही नको, अशा एक ना अनेक कटकटी टेम्पोमधून भाजीपाला दारात येत असल्याने संपल्या आहेत, असे गृहिणींनी सांगितले.

भाजीमंडईमध्ये गर्दी करून आम्हाला भाजीविक्री करायची नाही. हडपसर परिसरामध्ये परदेशातून आलेल्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे आम्हाला अधिकची जबाबदारी घ्यायची नाही, असा निश्चय व्यापाऱ्यांनी केला आहे. भाजीमंडईमध्ये बसून भाजी विक्री करण्यापेक्षा टेम्पोमधून भाजीपाला विक्री नागरिकांना आणि आम्हालाही सोयीची वाटत आहे. भाजी खरेदीसाठी गेल्यानंतर वाहन उभे करण्यासाठी जागा नसते, प्रचंड गर्दी असते, त्याचाच फायदा घेत भुरटे चोर हात साफ करतात, अशा एक ना अनेक कटकटीही या उपक्रमामुळे संपुष्टात येतील असे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी सांगितले.

रक्तदात्यांचा उत्तम प्रतिसाद – ससाणे
सावली फाउंडेशनच्या माध्यमातून नगरसेवक योगेश ससाणे यांनी मागिल चार दिवसांपासून ब्लड कॅम्प सुरू केला असून, आतापर्यंत 168 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले. तीन दिवस नोबल हॉस्पिटल, एक दिवस पूना ब्लड बॅक, उद्या रुबी हॉल क्नीलिक येणार आहे. ब्लँड 15 एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. दररोज सरासरी 40 नागरिक रक्तदान करीत आहेत. त्यामध्ये महिलांचा सहभाग वाढत आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे रक्तपुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे नागरिकांची गरज ओळखून हा उपक्रम सुरू केला आहे. त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे ससाणे यांनी स्पष्ट केले.