मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे त्रिकुट देहूरोड पोलिसांकडून जेरबंद

पुणे (देहूरोड) : पोलीसनामा ऑनलाईन – मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाच्या देहूरोड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून २ लाख ५० हजार रुपये किंमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारावाई देहूरोड परिसरात करण्यात आली. अक्षय राजू शेळके (वय २३, रा. सोमाटणे फाटा, मावळ), कार्तिक लक्ष्मण आढे (वय १९, रा. सोमाटणे फाटा, मावळ), सनी मनोज रॉय (वय १९, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचा एक साथीदार सादिक शेख (रा. मामुर्डी) अद्याप फरार आहे.

देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने वाहन चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल संकेत घारे आणि किशोर परदेशी यांना चारजण वाहन चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी हद्दीत गस्त घालत असताना तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या कसून चौकशीत त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरत असल्याची कबुली दिली. तसेच त्या गाडीचा कंटाळा आल्यानंतर दुचाकी त्याच ठिकाणी सोडून दुसरी दुचाकी चोरत असल्याची माहिती आरोपींनी दिली. आरोपींकडून देहूरोड पोलीस ठाण्यातील तीन आणि भोसरी पोलीस ठाण्यातील एक असे एकूण चार वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) पांडुरंग गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार, पोलीस उपनिरीक्षक अशोक जगताप, पोलीस कर्मचारी सुभाष सावंत, प्रमोद सात्रस, प्रमोद उगले, संकेत घारे, किशोर परदेशी, सचिन शेजाळ, अनिल जगताप, नारायण तेलंग यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त