दोन गुन्हेगारी टोळीतील वैमनस्यातून टोळक्यांचा सिंहगड रोडवर ‘हैदोस’, २५ वाहनांची तोडफोड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – हातात लोखंड कोयते, तलवारी नाचवत एका टोळक्याने सिहंगड रोडवरील २० ते २५ वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजविली. सिंहगड रोडवरील तुकाईनगर व समर्थनगर भागात मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. दोन गुन्हेगारी टोळ्यांमधील वैमनस्यातून हा प्रकार घडला असून त्यात अनेक लोकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.
सिंहगड रोड पोलिसांनी याप्रकरणी रात्रीतून १७ जणांना अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, सिंहगड रोड परिसरातील गुन्हेगार बंटी पवार याने हडपसर येथील चेतन ढेपे याला आदल्या दिवशी मारहाण केली होती. त्याचा बदला घेण्यासाठी चेतन ढेपे हा आपल्या साथीदारांसह सिंहगड रोड परिसरात मंगळवारी रात्री आले होते. मात्र, त्यांना बंटी पवार सापडला नाही. त्यामुळे त्यांनी तुकाईनगर, समर्थनगर भागात रस्त्याच्या कडेला लावलेल्या टेम्पो, कार, ट्रक, रिक्षा, मोटारसायकल अशा २० ते २५ वाहनांची तोडफोड केली. येथील नागरिकांच्या घरात घुसुन टीव्ही फ्रिज, पंखे यांची मोडतोड केली. तुकाईनगर येथील एका किरणा दुकानात घुसून आतील मालाची नासधुस केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त बच्चनसिंह, सहायक आयुक्त पौर्णिमा गायकवाड, पी. डी. राठोड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्योधन पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या गुन्हेगारांचा शोध घेऊन हडपसर येथून १३ जणांना व शहराच्या इतर भागातून ४ जणांना अशा १७ जणांना अटक करण्यात आली आहे. बंटी पवार आणि चेतन ढेपे हे दोघेही सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावर तसेच त्यांच्या साथीदारांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. या दोन टोळ्यातील वादात अनेक निष्पान नागरिकांना मात्र मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like