बंगालमध्ये अमित शहांच्या रॅलीत तोडफोड ; नेते संतप्त

पश्चिम बंगाल: वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधून एक घटना समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रॅलीतील वाहनांची तोडफोड केल्‍याची घटना घडली आहे. रॅली सुरु असलेल्‍या ठिकाणापासून काही अंतरावर काही वाहने लावण्यात आली होती. याच वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.

मंगळवारी पश्चिम बंगालमधील जनतेशी अमित शहा यांनी संवाद साधला. पश्चिम बंगालमधील पूर्व मिदनापूरच्या दौऱ्यावर ते होते. यावेळी त्‍यांनी तेथील नागरिकांशी संवाद साधला. त्‍यांनी तेथील जनतेला काही प्रश्न विचारले. बंगालला काय झाले आहे? सोनार बांग्‍ला कोठे गेला? आता सर्वांचे लक्ष बंगालवर आहे,’’ असे प्रश्न शहा यांनी विचारले.

दरम्‍यान, या हल्‍यानंतर भाजप नेत्‍यांनी संताप व्यक्‍त केला आहे. भाजप नेते राहुल सिन्हा यांनी आपला संताप व्यक्त करताना म्हटले की, “आमच्या क्षमतांना तृणमृत काँग्रेस घाबरत आहे. त्‍यामुळेच ते हिंसाचार करत आहेत. दुर्देव या गोष्‍टीचे आहे की, हा सर्व प्रकार पोलिसांच्यासमोर झाला.’’ हल्‍लेखोरांनी महिलांनाही सोडले नाही असेही सिन्हा यांनी म्‍हटले आहे. इतकेच नाही तर, राहुल सिन्हा यांनी या हल्‍ल्‍याला तृणमूल काँग्रेसला जबाबदार धरले आहे.

तर दुसरीकडे याबाबत भाजप नेते कैलास विजयवर्गीय यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘‘ममता बॅनर्जी यांना आम्‍ही आव्हान देत आहोत की, अशा प्रकारचे हल्‍ले करून कार्यकर्ते घाबरणार नाहीत आणि झुकणारही नाहीत. ममताजींना हे खूपच महागात पडणार आहे.