पश्चिम बंगालमध्ये मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर जमावाकडून वाहनांची जाळपोळ !

पोलिसनामा ऑनलाईन – पश्चिम बंगालमधील सिलगुडी येथे एका शाळकरी मुलीवर बलात्कार करुन खून केल्याचा आऱोप करीत संतप्त जमाव रस्त्यावर उतरला आहे. संतप्त जमावाकडून राष्ट्रीय महामार्ग अडवून जोरदार निदर्शन करण्यात आले. कोलकातापासून 500 किमी अंतरावर असणार्‍या ठिकाणी जवळपास दोन तास आंदोलन सुरु होते. पोलिसांनी आंदोलकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी जमावाकडून हिंसाचार सुरु झाला.

आंदोलकांनी यावेळी तीन बसेस आणि पोलिसांच्या वाहनांची जाळपोळ केली. जवळपास पाच वाजण्याच्या सुमारास आंदोलक दुसर्‍या ठिकाणी जात पोलिसांवर हल्ला करण्यास सुरुवात केला. खून करण्यात आलेल्या पीडित मुलीच्या बहिणीने दिलेल्या माहितीनुसार, मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबाने शोध सुरु केला होता. एका झाडाखाली तिचा मृतदेह सापडला होता. स्थानिकांनी मुलीवर बलात्कार करुन खून करण्यात आल्याचा आरोप केला आहे. पोलिसांना घटनास्थळी दोन सायकल आणि मोबाइल फोन सापडले आहेत. पश्चिम बंगाल पोलिसांनी मुलीचा शवविच्छेदन अहवाल ट्विट केला असून विषबाधा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले आहे. मुलीच्या शरीरावर कोणतीही जखम झाली नसल्याचे सांगत लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा फेटाळला आहे. दरम्यान प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून अद्याप पोलिसांनी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही.