‘घोडेबाजारा’मुळे ‘या’ मतदारसंघातील लोकसभा निवडणुक होऊ शकते रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तामिळनाडुच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून डीएमके उमेदवाराच्या कार्यालयातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. डीएमके उमेदवार कातीर आनंद यांच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध आयकर विभागाने गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुक रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवडणुक आयोगाने या संबंधीची शिफारस राष्ट्रपतींकडे पाठविण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

लोकसभा निवडणुकांची अधिसूचना ही जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. त्यांच्या आदेशानुसार निवडणुकांची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणुका रद्द करण्याचा अधिकारही त्यांनाच असतो. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याने तो उधळून लावण्यासाठी येथील निवडणुकच रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

तामिळनाडुच्या सर्व म्हणजे ३९ मतदारसंघात १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यांचा प्रचार मंगळवारी सायंकाळी संपणार आहे. अशावेळी निवडणूक आयोगाकडून वेल्लोर मतदार संघाबद्दल लवकरात लवकर निर्णय येण्याची शक्यता आहे.