मोठी बातमी : उद्या मतदान होणाऱ्या ‘या’ मतदारसंघातील निवडणुक रद्द

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उद्या मतदान होणाऱ्या तामिळनाडुमधील वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील मतदान निवडणुक आयोगाने रद्द केले आहे. वेल्लोर लोकसभा मतदार संघात मतदारांना पैशांचे आमिष दाखविण्याचे अनेक प्रकार घडल्यामुळे दुसऱ्या टप्यात १८ एप्रिल रोजी होणारे मतदान रद्द करण्याची शिफारस निवडणुक आयोगाने राष्ट्रपतींकडे केली होती. राष्ट्रपतींनी त्याला मान्यता दिल्यानंतर रात्री उशिरा निवडणुक आयोगाने हा आदेश काढला. देशात यंदा प्रथमच अशा मतदारांना आमिष दाखविल्याने संपूर्ण निवडणुकच रद्द करावी लागली आहे.

देशात आतापर्यंत पकडण्यात आलेल्या २ हजार २५० कोटींच्या रोख रक्कमेपैकी तामिळनाडूतून ४९४ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. वेल्लोर मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत रोख रक्कम, अमली पदार्थ, दारू, सोन्या चांदीच्या दागिन्यांसह मोफत भेटवस्तूंचे आमिष मतदारांना दाखविण्यात येत असल्याचा अहवाल निवडणुक आयोगाला मिळाला होता.

वेल्लोर लोकसभा मतदारसंघातून डीएमके उमेदवाराच्या कार्यालयातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. डीएमके उमेदवार कातीर आनंद यांच्यासह आणखी दोन जणांविरुद्ध आयकर विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

लोकसभा निवडणुकांची अधिसूचना ही जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतींकडे आहे. त्यांच्या आदेशानुसार निवडणुकांची प्रक्रिया सुरु होते. त्यामुळे अशा परिस्थितीत निवडणुका रद्द करण्याचा अधिकारही त्यांनाच असतो. या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार झाल्याने तो उधळून लावण्यासाठी येथील निवडणुकच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

You might also like