‘हा’ देश आणतोय एक लाखाची नोट पण त्यानं मिळतील फक्त 2 किलो बटाटे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   कधीकाळी दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला हा देश जगातील श्रीमंत देशांच्या यादीत गणला जायचा. पण आज या देशाच्या चलनाची किंमत रद्दीइतकी झाली आहे. तिथं महागाई एवढी वाढली आहे की जर कुणाला साधा चहा प्यायचा असेल तर लोकं बॅगभरून पैसे घेऊन जातात. यावर मार्ग काढण्यासाठी व्हेनेझुएला सरकारने एक शक्कल लढविली आहे. त्यासाठी सरकार अजून एकदा मोठ्या किंमतीची नोट चलनात आणत आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार व्हेनेझुएलात नोटांसाठी लागणारा कागदही आता आयात करावा लागत आहे.

व्हेनेझुएलाने एका इटालियन कंपनीकडून 71 टन पेपर नोट छपाईसाठी खरेदी केला आहे. व्हेनेझुएलाच्या मध्यवर्ती बॅंकेने 1 लाख बोलिवरची नोट सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. हे चलन व्हेनेझुएलातील आतापर्यंतचं सगळ्यात मोठं चलन असणार आहे. तरीसुध्दा एक लाख बोलिवर नोटेची किंमत फक्त 0.23 डॉलर असणार आहे. ज्यामध्ये फक्त 2 किलो बटाटेट येऊ शकतील!

एका अंदाजानुसार मागील वर्षीचा व्हेनेझुएलातील महागाई दर 2400 टक्के होता. याअगोदरही व्हेनेझुएला सरकारने 50 हजार बोलिवर नोट छापली होती. आता व्हेनेझुएला यापेक्षाही मोठी नोट आणण्याच्या प्रयत्नात आहे. व्हेनेझुएलात नैसर्गिक तेलाचा मोठा साठा असूनही या देशाला आर्थिक संकटातून बाहेर पडता येत नाहीये.

मागील सात वर्षापासून व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था आर्थिक मंदीचा सामना करत आहे. यावर्षी कोरोना महामारीने आणि तेलातील घटलेल्या उत्पन्नामुळे व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था 20 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकते. सरकारचे प्रत्येक राजस्व प्रयत्न अयशस्वी ठरत आहेत. व्हेनेझुएलात आता बरेच लोक व्यवहारात अमेरिकन डॉलरचा उपयोग करत आहेत. 2017 पासून व्हेनेझुएलात महागाई मोठ्या प्रमाणात वाढताना दिसली आहे.