महागाईमुळे देश संकटात ! व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती म्हणाले – ‘महिलांनी ६ अपत्यांना जन्म द्यायला हवा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भयंकर आर्थिक संकटाचा सामना करीत असलेल्या व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांनी केलेल्या अजब वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत. निकोलस मादुरो यांनी आपल्या देशातील महिलांना किमान 6 मुलांना जन्म देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनामागील राष्ट्रपतींचा हेतू व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था मजबूत करणे हा आहे.

खरं तर, आर्थिक संकटामुळे, गेल्या काही वर्षांत कोट्यवधी लोकांनी देश सोडला आहे. म्हणून राष्ट्रपती निकोलस महिलांना देश मजबूत करण्यासाठी आवाहन करीत आहेत. टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या कार्यक्रमात निकोलस शासन संचालित ‘बर्थ प्रोग्रॅम’ला प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमात बोलत होते.

कार्यक्रमात निकोलस एका महिलेला म्हणाले, ‘परमेश्वर तुम्हाला आपल्या देशाकरिता ६ अपत्यांना जन्म देण्याचा आशीर्वाद देवो.’ सर्व स्त्रियांनी सहा मुले जन्माला येईपर्यंत मुलांना जन्म दिला पाहिजे. आपल्या मातृभूमीला वाढू द्या. मात्र, राष्ट्रपतींच्या या टिप्पणीवर सर्वत्र टीकादेखील होत आहे. व्हेनेझुएलाचे लोक आणि मानवाधिकार कार्यकर्ते असे म्हणतात की देशात आधीच अन्न, कपडे आणि आरोग्य सेवांबद्दल एक संकट आहे.

युवा हक्कांचे रक्षण करणारे गट सीईकोडॅपचे संस्थापक ऑस्कर मिसले म्हणाले की, “देश अधिक मजबूत बनविण्यासाठी, महिलांना सहा मुले होण्यास प्रवृत्त करणे हे देशाच्या राष्ट्राध्यक्षांची बेजबाबदार वृत्ती आहे.” जिथे आधीच मुलांच्या जीवनाची हमी नाही. संयुक्त राष्ट्रांच्या म्हणण्यानुसार, देशाची आर्थिक स्थिती कोसळल्याने आणि राजकीय विभाजनामुळे 2015 पासून साडेचार लाखाहून अधिक लोकांना व्हेनेझुएलातून पलायन करावे लागले.

युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड फूड प्रोग्रॅमने नुकतेच म्हटले आहे की व्हेनेझुएलातील जवळपास एक तृतीयांश लोक आपली मुलभूत अन्नाची गरज भागवू शकत नाहीत. दोन मुलांची आई मॅग्डालेना डी मचाडो म्हणते, “आम्हाला सहा मुले होण्यास सांगने पूर्णपणे चुकीचे आहे.” आम्ही आठवड्यातून फक्त दोन दिवस चिकन खाऊ शकतो आणि आवश्यकतेपेक्षा कमी अन्न खरेदी करतो. डी माचाडो प्रमाणेच इतर महिलांचाही सरकारला प्रश्न आहे की, देशातील घसरत चाललेल्या आरोग्य सेवांनंतरही महिलांकडून जास्त मुलांना जन्म देण्याची अपेक्षा कशी करता येईल?