व्हेंटिलेटर, बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा, ‘आप’चा आंदोलनाचा इशारा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे. त्याचवेळी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर, बेड्स, ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. याची गंभीर दखल घेऊन सरकारने समयबद्ध ठोस कृती करावी. अन्यथा सोमवार दिनांक २० जुलैपासून महापालिका भवनासमोर बेमुदत उपोषण केले जाईल असा इशारा आम आदमी पार्टीचे संघटनमंत्री डॉ. अभिजित मोरे यांनी दिला आहे.

येत्या दोन महिन्यात संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता आहे ते लक्षात घेऊन व्हेंटिलेटर, आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर्स यांच्या संख्येत तातडीने वाढ करावी. सर्व खाजगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा अधीग्रहीत करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी पुणे शहरात करण्यात यावी. डशबोर्डवर शहरातील सर्व रुग्णालयातील बेड्सची उपलब्धता रिअल टाईम दिसायला हवी, बेड मिळविताना रुग्णांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांचा तक्रार निवारण सेल सुरु करावा, बेड्सचे ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई व्हावी. आदी मागण्या महापालिका आयुक्त यांना पाठविलेल्या पत्रात आम आदमी पार्टीचे संघटनमंत्री डॉ. अभिजित मोरे यांनी केल्या आहेत. येत्या आठवड्यात याबाबत समयबद्ध, ठोस कृती केली नाही तर २० जुलैपासून बेमुदत उपोषण केले जाईल असा इशाराही पार्टीने दिला आहे.