Nashik News : नाशिक महापालिकेत राडा, शिवसेना-भाजपचे नगरसेवक भिडले !

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –  नाशिक महापालिकेच्या महासभेत पाणीपुरवठ्याच्या विषयावर आज (मंगळवार) अभूतपूर्व गोंधळ झाला आणि महापौर सतीश कुलकर्णी यांनी सभागृहाचे कामकाज थांबवले. मात्र, त्यानंतरही शिवसेना आणि भाजपच्या नगरसेवकांमध्ये राजदंड घेण्यावरून रस्सीखेच सुरु झाली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेच्या नगरसेवकांमध्ये चांगलीच जुंपली.

नाशिकरोडमधील काही प्रभागात दारणा पंपिंग स्टेशनवरून पाणीपुरवठा केला जातो, मात्र, याबाबत तक्रार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी ऑनलाइन महासभा बंद पाडण्याचा प्रयत्न केला. शिवसेना नगरसेवकांनी ऑनलाइन महासभेत घुसून महापौरांना दूषित पाण्याबाबत जाब विचारला. प्रशासनाकडून उत्तरे मिळत नसल्याने शिवसेना नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरु करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली.

यावेळी काही नगरसेवकांनी राजदंड पळवण्याचा प्रयत्न केला. यावरुन प्रचंड आरडाओरढ सुरु झाली. राजदंड पळवण्यावरुन भाजप- शिवसेनेचे नगरसेवक एकमेकांना भिडले. सभागृहात भाजप-शिवसेना नगरसेवकांनी एकमेकांवर आरोप सुरु केले. भाजप नगसेवकांनी ही स्टंटबाजी असल्याचा आरोप केल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. हा वाद एवढा चिघळला आणि पुन्हा राजदंड पळवण्याचा प्रयत्न झाला. यामुळे सभागृहात मोठ्या प्रमाणात रेटारेटी झाली. अखेर महापौरांनी महासभा तहकूब केली.