कुंभ मेळ्याला या, सद्बुद्धी मिळेल ! योगींकडून ममतांना शालीतून जोडे

प्रयागराज : वृत्तसंस्था – ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यामधील संघर्ष चव्हाट्यावर आला आहे. योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांना उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभ मेळ्यासाठी आमंत्रित केले आहे. मात्र या आमंत्रणातून शालूतून जोडे मारण्याचा प्रकार योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. “कुंभमेळ्याला या, सद्बुद्धी मिळेल ! अशा शब्दात आमंत्रण देत त्यांनी ममतांवर टोला लगावला आहे.

… म्हणून ममतांचा थयथयाट

योगी आदित्यनाथ यांनी टीका करताना म्हंटले आहे की, ‘ममता यांनी कुंभ मेळ्यासाठी येऊन पाहावे की इथे किती स्वच्छता आहे. कदाचित त्यांना सद्बुद्धी मिळेल ज्यामुळे त्या पश्चिम बंगालच्या नागरिकांसोबत न्याय करू शकतील’ पश्चिम बंगालमध्ये भाजप वाढत असल्यानेच ममता यांचा थयथयाट चालू असल्याचा आरोप योगी आदित्यनाथ यांनी केला आहे. ममता बॅनर्जी आमच्या कार्यक्रमांमध्ये अडथळा आणतायत, जागा असूनही त्यांनी हेलिकॉप्टर लँडींगसाठी परवानगी दिली नाही असा आरोप आदित्यनाथ यांनी केला आहे.

ममतांची केंद्रसरकार विरोधी भूमिका

शारदा चिटफंड घोटाळ्यावरून ममता बॅनर्जी आणि भाजपमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या प्रकरणात कारवाई करण्यासाठी आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांनाच पोलिसांनी कोलकातामध्ये अटक केली होती. ममता यांनी आरोप केला होता की या प्रकरणामध्ये कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयापर्यंत हे प्रकरण गेलं असून तूर्तास राजीव कुमार यांना न्यायालयाने अटकेपासून संरक्षण दिले आहे.