काय सांगता ! होय, मतदार यादीत 99 वर्षांवरील तब्बल 3154 मतदार, जिल्हाधिकार्‍यांनी दिलं स्पष्टीकरण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – मतदार यादीत आता वयाचा नवा घोळ समोर आला आहे. नागपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील पडताळणीत तब्बल 3 हजार 154 मतदारांचे वय 99 वर्षापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. यामुळे अनेकांनी आश्चर्य़ व्यक्त केले आहे. मात्र जिल्हाधिका-यांनी यात त्रुटी असून याद्यांची दुरुस्ती केली जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.
मतदार यादीमध्ये आतापर्यंत आपण नाव, पत्ता, फोटो आदीचा घोळ झालेल्या पाहिला होता. पण आता हा वयाचा नवीनच प्रकार समोर आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे म्हणाले की, नियमित मतदारांच्या नोंदणीचा कार्यक्रम दि. 16 नोव्हेंबरपासून सुरुवात केला आहे. 5 जानेवारीपर्यंत नवीन मतदार नोंदणी करू शकतील. त्यानंतर 15 जानेवारीला मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

तसेच मतदार यादीत दुबार नावे असलेले तब्बल 26 हजार 683 मतदार असल्याचे सांगण्यात आले. तसेच 2 लाख 4 हजार मतदारांचे फोटोच कार्डवर नाहीत. तेंव्हा नवीन मतदारांनी आपली नावे नोंदवतांना मतदारांच्या नावात, पत्यात, वयात काही दुरुस्त्या असतील त्या करून घ्यावे. तसेच कुटुंबात मृत पावलेल्या मतदारांचे नाव कमी करण्यासाठी संबधित कुटुंबाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.