‘व्हीव्हीपॅटवरील किमान 50 टक्के मतांची पडताळणी करा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत तशा अनेक राजकीय घडामोडींना उधाण येताना दिसत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांना समोर ठेऊन लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी आज सायंकाळी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच मत पत्रिका आणायची नसल्यास निवडणूक निकालांवेळी व्हीव्हीपॅटच्या मतांची आणि ईव्हीएममधील किमान 50 टक्के मतांची पडताळणी करावी, अशी मागणी केली आहे.

विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर सदस्यांची भेट घेतली. तसेच देशातील लोकांना ईव्हीएमबाबत संशय असून त्याचे निरसण करण्याची गरज आहे, असे विरोधी पक्षांच्या प्रतिनिधींनी निवडणूक आयोगाला निवेदन दिले. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे, टीडीपीचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांचे शिष्टमंडळ गेले होते.

दरम्यान यावेळी शिष्टमंडळाने देशभरामध्ये ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असल्याने जुन्या पद्धतीने म्हणजेच बॅलेट पेपरने मतदान घ्यावे अशी मागणी केली. परंतु ते शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. यानंतर विरोधकांनी दोन बैठका घेत किमान 50 टक्के व्हीव्हीपॅट मशिनवरील मतांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाकडे गेलेल्या विरोधकांच्या शिष्टमंडळात काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल आणि आनंद शर्मा, तेलगू देसम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजिद मेनन, तृणमुल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव, बसपचे सतीशचंद्र मिश्रा, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे मोहमद सलीम आणि टी. के. रंगराजन, राजदचे मनोज झा, आपचे संजय सिंह, भाकपचे डी. राजा, जेडीएसचे दानिश अली, आरएसपीचे एन. के. प्रेमचंद्रन, एआययुडीएफचे बद्रुद्दीन अजमल आणि एनपीएफचे के. जी. केनये आदी नेते होते. दरम्यान, सुरुवातीला विरोधी पक्षाचे नेते कॉन्सिट्युशन क्लब येथे एकत्र आले आणि त्यानंतर पुढील नियोजन करण्यात आले.