‘तिचं जाणं ही सातारकरांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी’ : उदयनराजे भोसले

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार गोडसे हिचं जाणं सातारकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी आहे अशा भावना खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केल्या आहेत. उदयनराजेंनी यासंदर्भात फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

आपल्या पोस्टमध्ये उदयनराजे म्हणतात, “कोमलला 2017 साली प्लमोनरी हायपरटेंशन या व्याधीचं निदान झालं आणि जणू काही तिथंच तिचं आयुष्य स्तब्ध झालं. परंतु तिनं आणि तिच्या पतीनं धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून परत आली. दोन्ही फुप्फुसं आणि हृदय प्रत्यारोपण झालेली कोमल ही महाराष्ट्रातील पहिली मुलगी ठरली होती. 3 दिवसांपूर्वी अचानक कोमलचा आजार वाढला आणि तिला डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर ताबडतोब हैदराबादला शिफ्ट करण्यात आलं. परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्काच बसला.” असं ते म्हणाले.

पोस्ट पुढे बोलताना उदयनराजे म्हणतात, “कोमल आणि तिचे पती धीरज दोघांनी कोमल न्यू लाईफ फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली होती. त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशनसाठी खूप काम केलं. गरजूंना वाटेल ती मदत केली. जनजागृती केली. स्वभावानं अत्यंत प्रेमळ, मनमिळावू हसतमुख अशा कोमलला सातारा नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणी प्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली” असं म्हणत त्यांनी शोकसंदेश दिला आहे.

कोण आहे कोमल पवार ?

कोमल ही साताऱ्यातली आहे. तिचा विवाह फलटण तालुक्यातील तरडफ येथील धीरज विलास गोडसे यांच्याशी झाला होता. लग्नानंतर एका वर्षातच ती आजारी पडली होती. सातारा, पुणे, मुंबई, बेंगलोर अशा अनेक ठिकाणी तिच्यावर उपचार करण्यात आले. परंतु आजार दिवसेंदिवस गंभीर रूप धारण करत होता. त्यामुळं डॉक्टरांनी हृदय आणि फुप्फुस प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता. अवयव तर उपलब्ध झाले. परंतु पैशांअभावी उपचार थांबले होते. शस्त्रक्रियेसाठी दवाखान्याचा खर्च हा 35 लाख तर एकूण खर्च 54 लाख येणार होता. संपूर्ण सातारकर आणि समाजसेवी संस्थाच्या मदतीनं कोमलवर यशस्वी उपचार पार पडले. प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर कोमलनं मृत्यूवर मात केली. कोमलला अवयवदानामुळं पुनर्जन्म मिळाला होता. ही किमया अवयव दानामुळंच साध्य झाली होती.

यानंतर कोमल आणि तिच्या पतीनं आपल्या फाऊंडेशनच्या मार्फत अवयवदानाचं महत्तव पटवून देण्यासाठी जागृती करत अशा गरजूंना मदत करण्याची भूमिका घेतली होती.