Bollywood मधील ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेते दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांचे आज सकाळी निधन झाले आहे. दिनयार 78 वर्षांचे होते, वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. आज दुपारनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिनयार यांना वाहिली आदरांजली
दिनयार यांच्या जाण्याने बॉलिवूड कलाकार आणि चाहते शोकाकुल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिनयार यांच्या जाण्याने दु:ख व्यक्त केले आहे. आपल्या ट्विटमध्ये मोदी म्हणतात की, “दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले आहे. त्यांच्या अभिनयाने त्यांनी अनेकांना हसवले आहे. मी त्यांच्या कुटुंबाच्या दु:खात सहभागी आहे.” असे म्हणत त्यांनी दिनयार यांना आदरांजली वाहिली आहे.

अशी केली होती करिअरला सुरुवात
दिनयार यांच्या करिअरच्या सुरुवाती बद्दल सांगायचे झाले तर थिएटर आर्टीस्ट म्हणून दिनयार यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली होती. गुजराती तसेच अनेक हिंजी नाटकांमध्ये त्यांनी काम केले आहे. उल्लेखनीय बाब अशी की, याचवर्षी दिनयार यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

दिनयार यांनी केले सिनेमे आणि मालिका
दिनयार यांनी अनेक मालिकेत काम केले आहे शिवाय त्या मलिका गाजल्याही आहेत. अनेक वर्षांपूर्वी त्यांनी हम सब एक है या मालिकेत काम केलं होतं. यात त्यांची भूमिका फार गाजली होती. त्यांचा संवाद लोकांच्या आजही लक्षात आहे. मेरे पास बहोत पैसा है हा त्यांचा संवाद खूपच प्रसिद्ध झाला होता जो आजही लोकांच्या लक्षात आहे. याशिवाय दिनयार यांनी अनेक सिनेमात काम केले आहे. बाजीगर, 36 चायना टाऊन, खिलाडी, बादशाह यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमात काम केले आहे.