ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष राम जाधव यांचे निधन

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन –  ज्येष्ठ रंगकर्मी, रत्नागिरी येथे झालेल्या नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, रंगभूमी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व अकोला भूषण राम जाधव यांचे आज दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या निधनाने नाट्य क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. मागील ५ दशकांपासून अकोल्याची नाट्य चळवळीत ते कार्यरत होते. या जातीवंत कलावंताने जीवनाच्या रंगभूमीवरून अखेर आज एक्झिट घेतली. ते ८७ वर्षांचे होते.

राम जाधव यांनी अगदी लहानपानापासूनच रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. लहान -मोठ्या भूमिकामधून त्यांनी आपली कलेतील चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात त्यांनी अनेक भूमिका साकारल्या. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य रंगभूमीला अर्पण केले. त्यांनी रेल्वे मध्ये तिकीट कलेक्टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांची भूमिका सुद्धा ते साकारत होते. प्रायोगिक रंगभूमीला सन्मान मिळवून देण्याचे मामांनी म्हणजेच राम जाधव यांनी केले.

मामा हे रंगभूमीला व्यवसाय न मानता पूजा मानणारे होते. मामांनी अभिनया सोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप सोडली आहे. मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह अनेक संस्थांकडून त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. राम जाधव यांनी २०११ मध्ये रत्नागिरी येथे भरलेल्या ९१ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. हा अकोलेकरांसाठी फार मोठा सन्मान होता. जीवनभर सतत नाटक आणि नाटक हाच ध्यास घेतलेला हा कलावंत गेल्याने अकोल्याच्या नाट्य क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.अकोल्यात सुसज्ज नाट्यगृह असावे हे मामांचे स्वप्न होते मात्र त्यांच्या जाण्याने ते आता अपूर्णच राहिले आहे.