ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ रंगकर्मी राजा मयेकर (वय – 90) यांचे आज (शनिवार) दुपारी बाराच्या सुमारास निधन झाले. त्यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे.

लोकनाट्याचा राजा असा किताब मिळवणाऱ्या मयेकर यांनी साठ वर्षे अभिनयक्षेत्र गाजवले होते. मयेकर यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांची दूरदर्शनवरील गप्पागोष्टी ही मालिका गाजली होती. राजा मयेकर यांनी सिनेमा, टीव्ही मालिका, नाटक आणि आकाशवाणी या क्षेत्रांमध्ये काम केले.

राजा मयेकर यांनी दशावतारी नाटकापासून अभिनयाची सुरुवात केली. लोकनाट्यमधून त्यांनी व्यावसायिक रंगभूमी जवळून पाहिली. त्यांनी बालगंधर्वांच्या नाटकात देखील काम केले होते. तसेच त्यांनी संगीत नाटकात देखील आपला ठसा उमटवला होता.

You might also like