‘कालिया’ विजू खोटे यांचं निधन, 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ज्येष्ठ अभिनेते आणि ‘शोले’मधील कालिया विजू खोटे (वय ७८) यांचे आज पहाटे निधन झाले. त्यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत ३०० हून अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमधून काम केले होते. गिरगावातील गावदेवी येथे ते रहात होते.

खोटे कुटुंबातील अनेक जण चित्रपटसृष्टीत होते. शोभा खोटे यांचा भाऊ म्हणून सुरुवातीला १९६८ मध्ये विजू खोटे यांनी ‘अनोखी रात’ या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पर्दापण केले. मिळेल त्या छोट्या मोठ्या भुमिका ते करत होते. त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या अजरामर ‘शोले’ या चित्रपटातील एका संवादामुळे. मल्टीस्टार कास्ट असलेल्या या चित्रपटात विजू खोटे यांची छोटीशी कालियाची भूमिका होती. त्यात त्यांचा एक संवाद अजूनही लोकांच्या कायमचा स्मरणात आहे.
कालिया म्हणतो, ‘सरकार, मैने आपका नमक खाया है, ’ त्यावर गब्बरसिंग म्हणतो, ‘अब गोली खा’
या संवादाला ४४ वर्षे झाली तरीही एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत हा संवाद अजूनही सांगितला जातो.
‘अंदाज अपना अपना’मधील त्यांचा ‘गलतीसे मिस्टेक हो गया’ हा रॉबर्टचा संवादही चांगलाच गाजला होता.

विधाता, नमक हलाल, कच्चे हीरे, पुकार, इंडियन, खिलाडी ४२०, चाइना गेट, हमसे बढकर कौन, घरवाली बाहरवाली अशा अनेक चित्रपटात त्यांनी छोट्या मोठ्या भूमिका केल्या होत्या. अशीही बनवा बनवी मधील त्यांची भूमिका गाजली होती.

कोणत्याही भुमिकेला नाही म्हणायचे नाही, अशी भूमिका घेऊन ते मराठी, हिंदी चित्रपटसृष्टी वावरले.
अचूक संवादफेक आणि कामावरील निष्ठा यामुळे ते हिंदी चित्रपटसृष्टी अखेरपर्यंत कार्यरत होते.

Visit : Policenama.com