जेष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचे निधन

वृत्तसंस्था : मुंबई

पाकिजा आणि रजिया सुलतान सारख्या गाजलेल्या सिनेमातून काम लेल्या जेष्ठ अभिनेत्री गीता कपूर यांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी मुंबई येथे घडली. गीता कपूर यांचे निधन वृद्धाश्रमात झाल्याचे समजते आहे. कमाल अमरोही यांच्या पाकीजा सिनेमात गीता यांनी राजकुमार यांच्या दुसऱ्या पत्नीची भूमिका साकारली होती. निर्माते अशोक पंडित यांनी गीता यांच्या निधनाची बातमी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून दिली. अशोक यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला.

एका प्रसिद्ध इंग्रजी वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीनुसार अशोक म्हणाले की, ‘आम्ही आमच्यापरिने सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण अखेर आज सकाळी ९ वाजता गीताजी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या वर्षभरापासून त्या आपल्या मुलांची वाट पाहत होत्या. पण या वर्षभरात कोणीच त्यांना भेटायला आले नाही. त्यांना बरे वाटावे म्हणून गेल्या शनिवारी आम्ही ग्रॅण्ड ब्रेकफास्टचे नियोजनही केले होते. त्या व्यवस्थित होत्या, पण आतून त्या आनंदी नव्हत्या. गीताजी यांना त्यांच्या मुलांना शेवटचे पाहायचे होते. पण त्यांची ही इच्छा अपुरीच राहिली. कारण त्यांना भेटायला वर्षभरात कोणीच आले नाही. आज सकाळी ९.०० वाजता वृद्धापकाळाने त्यांचा मृत्यू झाला.’ पाकिजा सारख्या चित्रपटातून काम केलेलया या अभिनेत्रीचा अशा प्रकारे मृत्यू होणे ही खूप हळहळीची गोष्ट मानावी लागेल .