काँग्रेसच्या ‘या’ दिग्गज नेत्याचा अजित पवारांना इशारा, म्हणाले – ‘तर आम्हाला आमची भूमिका वठवावी लागेल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शासकीय नोकरीतील पदोन्नती आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष पुन्हा एकदा दिसत आहे. पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भात ठाकरे सरकराने काढलेला अध्यादेशाला स्थगिती द्यावी, अन्यथा आम्हाला देखील आमची भूमिका मांडावी लागेल असा इशारा काँग्रेसचे नेते ऊर्जामत्री नितीन राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला आहे. त्यानंतर अजित पवार यांच्या कार्यालयाकडून या अध्यादेशाला तात्पुरती स्थगिती दिल्याचे सांगत राऊतांना दणका देण्यात आला. यानंतर अजित पवार आणि नितीन राऊत असा संघर्ष समोर आला आहे.

पदोन्नती आरक्षणाच्या संदर्भात अजित पवार यांच्या समवेत नितीन राऊत, वर्षा गायकवाड यांची एक बैठक झाली. बैठकीत राऊत यांनी तात्काळ सात मेच्या पदोन्नती आरक्षणाचा अध्यादेशाला स्थगिती द्यावी, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर या अद्यादेशाला स्थगिती देण्यात आली. राऊत यांनी गुरुवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना थेट अजित पवार यांचे नाव न घेता इशारा दिला आहे. राज्य सरकार स्थापन करताना कॉमन मिनिमम प्रोग्राम आयोजित केला होता. यात आरक्षणाच्या मुद्दावर देखील चर्चा झाली होती. त्यामुळे राज्य सरकार जर वेगळी भूमिका घेत असेल तर आम्हाला आमची भूमिका वठवावी लागेल, असा इशारा राऊतांनी दिला आहे. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहेच पण त्याच वेळी मागासवर्गीय अधिका-यांचे अधिकार हिरावून घेऊ नये, निर्णय घेताना परस्पर घेऊ नये, ही आमची भूमिका असल्याचे ते म्हणाले. वास्तविक फडणवीस सरकारने यापूर्वी अध्यादेश काढताना मागासवर्गीय अधिकारी प्रमोशन याचा कोटा राखीव ठेवला होता. पण आता जीआर काढताना मात्र तसे केले नाही अशी नाराजी देखील राऊतांनी ठाकरे सरकारवर बोलून दाखवली आहे.