‘बंडखोर’ अभिनेत्री लालन सारंग यांचे निधन

पुणे : पोलीसनामा आॅनलाइन – सखाराम बाईडर, रथचक्र, कमला या सारख्या नाटकांमधून आपली प्रतिमा दाखवून देणाऱ्या बंडखोर अभिनेत्री लालन सारंग यांचे वृद्धापकाळाने  निधन झाले आहे. त्या ७९ वर्षाच्या होत्या. आजारपणामुळे गेल्या एक महिन्यांपासून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते.

लालन सारंग यांचा जन्म २६ डिसेंबर १९४१ रोजी झाला. सखाराम बाइंडर, रथचक्र आणि कमला या लालन सारंग यांच्या आयुष्यातील तीन महत्वाची नाटके. त्यातील त्यांच्या भूमिका कलावंत म्हणून त्यांचा कस पाहणाऱ्या तर होत्याच, पण त्याहीबरोबर जगण्याचं नवं भान देणाऱ्या होत्या. लालन सारंग भारतीय रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्यांची ओळख होती. पण त्यांचे व्यक्तीमत्व त्याहीपेक्षा बरच गहिरे होते. बंडखोरपणा त्यांच्या आयुष्यातही आहेत. काळाच्या पुढे जाणाऱ्या असंख्य भूमिका त्यांनी केल्या आणि त्यातून निर्माण होणारी वादळे अंगावर घेतली. लालन सारंग या तेंडुलकरांच्या नायिका म्हणून ओळखल्या जात. सखाराम बाईंडर, घरटे आमचे छान, बेबी, कमला अशा तेंडुलकारांच्या नाटकांनी लालन सारंग यांना बरच काही मिळवून दिले.

लालन सारंग मूळच्या गोव्याच्या. पण त्यांचे जन्मापासूनचे आयुष्य मुंबईत गेले. पहिल्या वर्षी  बावळट मुलगी म्हणून कमलाकर सारंग यांनी जिला हिणवल. त्याच लालन सारंग यांना कमलाकर सारंग यांनी पुढच्या वर्षी स्वत:च्या नाटकात रोल दिला. नाटकातून त्यांची ओळख वाढत गेली. दोघे एकाच संस्थेत काम करत होते. पुढे त्यांनी आयुष्याची दोरी एकत्र बांधली.

सखाराम बाईंडरच्या आधीही लालन सारंग यांनी सहा व्यावसायिक नाटकं केली होती. सारंग यांच्या आयुष्यातला माइल स्टोन रोल म्हणजे सखाराम बार्इंडरमधील चंपाची भूमिका. या भूमिकेने त्यांना नवी ओळख मिळवून दिली.

सखाराम बार्इंडर हे लालन सारंग यांच्या जीवनातले एक वादळी पर्व. महाराष्ट्राच्या इतिहासात दुसऱ्या कोणत्याही नाटकावरून इतके वाद झाले नाहीत. दुसऱ्या  कोणत्याही नाटकासाठी इतकी मोठी लढाई झाली नाही. सखाराम बार्इंडरच्या वादातून कमलाकर सारंग यांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे घरात पैशाची चणचण नेहमीचीच. तरीही त्यांनी नाटक बंद पडू दिले नाही. लालन सारंग यांनी गुजराती, मराठी आणि हिंदी या तिन्ही रंगभूमीवर काम केले तरी मराठी रंगभूमीच त्यांची आवडती होती.

आक्रोश (वनिता), आरोप (मोहिनी), उद्याचा संसार, उंबरठ्यावर माप ठेविले, कमला (सरिता), कालचक्र (दिग्दर्शन आणि अभिनय),  खोल खोल पाणी (चंद्राक्का), गिधाडे (माणिक), घरकुल, घरटे अमुचे छान (विमल), चमकला ध्रुवाचा तारा, जंगली कबुतर (गुल), जोडीदार (शरयू), तो मी नव्हेच ,धंदेवाईक (चंदा), बिबी करी सलाम, बेबी (अचला), मी मंत्री झालो, रथचक्र (ती), राणीचा बाग, लग्नाची बेडी, सखाराम बाइंडर (चंपा), संभूसांच्या चाळीत, सहज जिंकी मना (मुक्ता), सूर्यास्त (जनाई), स्टील फ्रेम (हिंदी) आदी नाटकांमधून त्यांनी कामे केली.

लालन सारंग यांना ग.दि. माडगूळकर प्रतिष्ठानचा गृहिणी सखी सचिव हा पुरस्कार मिळाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या कलारंग सांस्कृतिक संस्थेतर्फे  कलागौरव पुरस्कार, २००६ साली कणकवली येथे झालेल्या ८७व्या मराठी नाट्यसंमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या कोथरूड शाखेतर्फे जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता.

अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असणाºया लालन सारंग या उत्तम गृहिणीही आहेत. त्या उत्तम स्वयंपाक करतात. पाककलांवर त्यांनी पुस्तके  लिहिली आहेत. मधल्या काळात त्यांनी बुटिकही काढले़  स्वयंपाक व विविध प्रकारचे पदार्थ बनविण्याची त्यांना आवड आहे. पुण्यात ‘मासेमारी’ हे हॉटेल उघडले आहे. उत्तम गोमंतकीय पद्धतीने बनविलेल्या माशाच्या विविध प्रदार्थांसाठी हे हॉटेल प्रसिद्ध आहे. या हॉटेलमधील रेसिपी स्वत: लालन सारंग यांनी तयार करुन दिली असून त्यानुसारच ते पदार्थ बनविले जातील. याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. आता त्या नसल्या तरी त्यांच्या रेसिपीच्या माध्यमातून त्यात रसिक खवय्यांना पुढेही नक्कीच आनंद देत राहतील.

नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता प्रकरणातील दिग्दर्शक राकेश सारंग हा त्यांचा मुलगा.