प्रसिद्ध संगीतकार खय्याम यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडचे सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक मोहम्मद जहूर खय्याम यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना जुहूच्या सुजॉय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. आज (सोमवार) रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.

१९४७ साली फिल्मी करिअर सुरु करणाऱ्या खय्याम यांनी अनेक गाण्यांना संगीत दिले आहे. पण खऱी ओळख मिळाली ती १९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘फिर सुबह होगी’ या चित्रपटाने. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी कमालीची लोकप्रिय झाली होती. कभी कभी, उमराव जान, अशा सुपरडुपर हिट चित्रपटांना खय्याम यांनी संगीत दिले होते. कभी कभी आणि उमराव जान या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

खय्याम यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. खय्याम यांनी सामाजिक बांधीलकी जपत आपल्या ९० व्या वाढदिवसाला खय्याम यांनी सुमारे १२ कोटींची रक्कम ‘खय्याम प्रदीप जगजीत ट्रस्ट’ला दान केली होती.