पहिले हिंदकेसरी ज्येष्ठ कुस्तीपटू श्रीपती खंचनाळे यांचे निधन

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – लालमातीत भल्याभल्यांना आस्मान दाखवणारे ज्येष्ठ कुस्तीपटू भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय 86) ( Hindkesari Shripati Khanchanale) यांचे सोमवारी (दि. 14) सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. प्रकृती बिघडल्याने खंचनाळे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज सकाळी साडेआठच्या सुमारास रुग्णालयातच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

श्रीपती खंचनाळे यांचा जन्म 10 डिसेंबर 1934 रोजी शेतकरी कुटुंबात झाला होता. 1959 मध्ये झालेल्या पहिल्या हिंद केसरी स्पर्धेत बनता सिंग यांना पराभूत करत श्रीपती खंचनाळे हे देशातील पहिले हिंद केसरी ठरले होते. त्याचवर्षी आनंद शिरसागर यांना पराभूत करत त्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धाही जिंकली होती. खंचनाळे हे मूळचे सीमाभागातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा गावचे होते. ते कित्येक वर्षांपासून कोल्हापुरात वास्तव्यास होते. विविध कुस्ती स्पर्धांत त्यांनी कोल्हापूरचा डंका देशभर वाजविला. नवीन मल्लांना तालमीत धडे देण्याचे काम ते करीत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक मल्लांनी विविध कुस्ती मैदाने गाजवली होती. दरम्यान, प्रकृती बिघडल्याने नोव्हेंबर महिन्यात त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. अखेर आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.