मंदिर तर बांधणारच : अयोध्येत ७० ट्रक दगड लवकरच पोहचणार 

अयोध्या : वृत्तसंस्था  – २९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी- बाबरी मशीद वादावर सुनावणी होणार आहे. मात्र यापूर्वीच विश्व हिंदू परिषदेने मंदिर उभारणीसाठी ७० ट्रक दगडांची ऑर्डर दिली आहे. २०१९ च्या अगामी लोकसभा निवडणुकांमुळे राजकीय पक्ष राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत आहेत. यामुळेच देशातील राजकीय वातावरण तसेच अयोध्येतील  राम मंदिरा  बांधकामाच्या मुद्या वरून स्थानिक वातावरणही ढवळून निघाले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि शिवसेनेने राम मंदिर उभारण्याची हाक दिली आहे. दरम्यान अयोध्येत मात्र राम मंदिर बांधण्याच्या हालचाली देखील सुरु झाल्या आहेत. येत्या २९ ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयात राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सुनावणी सुरू होणार आहे. त्यापूर्वीच विश्व हिंदू परिषदेने राम मंदिरांचे  प्रस्तावित मॉडलही तयार केले आहे. त्यावर विश्व हिंदू परिषदेने कामही सुरू केले आहे. विश्व हिंदू परिषदेने ७० ट्रक दगडांची ऑर्डर दिली असून लवकरच हे ट्रक अयोध्येत पोहोचणार आहेत. कायदेशीर परवानगी मिळाल्यानंतर तीन मजली भव्य राम मंदिर उभारता यावे म्हणून कारागिरांशी बोलणीही सुरु झाली आहे.
आता आम्ही माघार घेणार नाही. ही सत्याच्या विजयाची लडाई आहे. राम मंदिराची उभारणी लवकरात लवकर व्हावी म्हणून कारागिरांची गरज आहे. त्यासाठीच कारागिरांशी बोलणी सुरू झाली आहे.  आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट पाहत आहोत, असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, विहिंपने सुरू केलेल्या राम मंदिर उभारणीच्या हालचालींवर मुख्य पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे सरकारने  विश्व हिंदू परिषदेला  रोखले  पाहिजे. निवडणुकांच्या तोंडावरच  विश्व हिंदू परिषद अशा प्रकारच्या गोष्टी करत असते अशी टीकाही मुख्य पक्षकार इक्बाल अन्सारी यांनी केली आहे.
विशेष म्हणजे  राम जन्मभूमी स्थळापर्यंत जाणारे रस्ते लोकांसाठी बंद करण्यात आले आहेत. या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.