‘जामिया’ विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांच्या सोबत चक्क ‘कुलगुरु’ही, पहाटे 3 वाजता आंदोलन मागे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – नागरिकत्व संशोधन कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी हिंसाचारानंतर ताब्यात घेतले. विद्यापीठाच्या आवारात शिरण्यास पोलिसांना परवानगी दिलेली नसतानाही पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना शोधून पकडून नेले होते. त्यानंतर कुलगुरु नजमा अख्तर यांचा एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ज्या प्रकारे माझ्या विद्यार्थ्यांसोबत कारवाई केली. त्यामुळे मी दु:खी आहे. या लढाईत तुम्ही एकटे नाही, मी तुमच्याबरोबर आहे. हा मुद्दा जेथे शक्य होईल, तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. विद्यापीठात शिरुन ताब्यात घेतलेल्या ५०विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांनी पहाटे ३ वाजता सोडून दिल्यानंतर पोलीस मुख्यालयासमोर सुरु असलेले आंदोलन विद्यार्थ्यांनी मागे घेतले.

जामिया विद्यापीठाच्या प्रशासनाची परवानगी नसताना कॅम्पसमध्ये शिरुन पोलिसांनी विद्यार्थ्यांना शोधून शोधून मारहाण केली. त्यांना पकडून नेण्यात आले. जामिया मिल्लिया इस्लामिया विद्यापीठाजवळ न्यू फ्रेंडस कॉलनीमध्ये पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. त्यात आंदोलकांनी चार बसगाड्या आणि दोन पोलीस वाहनांना आग लावून पेटवून दिली. त्यात विद्यार्थी, पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान असे जवळपास ६० जण जखमी झाले.

पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रुधूराची नळकांडी फोडली. मात्र, गोळीबार केल्याचा इन्कार केला आहे. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गोळी लागून विद्यार्थी जखमी झाल्याचे दिसत आहे. या हिंसाचाराशी आपला काहीही संबंध नाही, असे जामिया छात्र संघाने जाहीर केले. नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनातील हिंसाचाराशी आपला संबंध नसल्याचे विद्यार्थी संघाने म्हटले आहे.

या हिंसाचारानंतर पोलिसांनी विद्यापीठात शिरुन शोधून मुलांना पकडून नेले. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईविरोधात विद्यार्थींनी पोलिसांविरोधात घोषणा देत पोलीस मुख्यालयाकडे जाणारी सर्व वाहतूक रविवारी रात्री रोखून धरली होती. विद्यार्थ्यांचे हे आंदोलन पहाटे तीन वाजेपर्यत सुरु होते. विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि विद्यापीठाकडून परवानगीशिवाय शिरुन केलेल्या मारहाणीचा आरोप यामुळे पोलीस प्रशासन अडचणीत आले होते.

शेवटी रविवारी पहाटे ३ वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ५० आंदोलक विद्यार्थ्यांना सोडून दिले. त्यात कालकाजी पोलीस ठाण्यातील ३५ आणि न्यू फ्रेंडस कॉलनी पोलीस ठाण्यातील १५ विद्यार्थ्यांचा समावेश होता़ विद्यार्थ्यांना सोडून देण्यात आल्यानंतर पहाटे तीन वाजता विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेऊन सर्व जण विद्यापीठात परत आले आहेत.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/