धक्कादायक ! बलात्काराचा गुन्हा मागे घेत नाही म्हणून पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवले, अहमदनगर जिल्हयातील घटना

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  अहमदनगरमध्ये एका आरोपीने बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने थेट पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची घटना घडली आहे. पारनेर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. राजाराम तरटे आणि अमोल तरटे अशी आरोपींची नावे आहेत.

पारनेरमधील आदिवासी समाजातील 26 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. याप्रकरणी पीडितेने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, आरोपींनी पीडितेला हा गुन्हा मागे घेण्यास सांगितले. पीडितेने त्यांची मागणी मान्य न केल्याने आरोपींनी थेट अत्याचारित पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवले.

या घटनेत मुलगी गंभीर जखमी आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. गुन्हेगारीच्या अशा घटना भर दिवसा घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.