पीडित माहिलेची DSK च्या विरोधात दिवाणी न्यायालयात ‘धाव’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – गुंतवणुकदारांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या येरवडा तुरुंगात असलेले डीएसके उर्फ दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नीवर एका महिलेने दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. या महिलेने डीएसके यांच्या कंपनीमध्ये 40 लाख रुपये गुंतवणूक केली होती. या रक्कमेवरील व्याज मिळावे यासाठी तिने दिवाणी न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायाधीश आर.एच. नाथानी यांच्या न्यायालयात हा दावा दाखल करण्यात आला आहे.

डीएसके समूहाचे दीपक सखाराम कुलकर्णी आणि त्यांची पत्नी हेमंती दिपक कुलकर्णी यांच्या विरोधात 40 लाख रुपये आणि त्यावरील व्याज मिळावे यासाठी पुण्यातील पीडित महिलेने तक्रार दिली आहे. पीडित महिला ही घटस्फोटीत असून ती आपल्या मुलीसह पुण्यात राहते. घटस्फोट मिळवताना मुंबई कौटुंबिक न्यायालयात 2011 मध्ये तडजोड झाली. मुंबई कौटुंबिक न्यायालयात तिच्या पतीने पीडित महिलेला कायमस्वरुपाची एकरकमी पोटगी व तडजोडीची एकरकमी पोटगी 40 लाख रुपये दिले होते. मुलीच्या शिक्षणासाठी व भविष्यात लग्नाच्या खर्चासाठी जास्त पैसे मिळतील तसेच डीसके समूहाच्या चांगल्या परताव्याच्या आमिषाने तिने 2012 मध्ये पैसे डीएसके ग्रुपमध्ये गुंतवले होते.

डीसके कुटुंब सध्या पुणे येथील येरवडा कारागृहात असून त्यांच्यावर राज्यात अनेक ठिकाणी फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. न्यायालयाचे आदेशानुसार डीएसके समूहाच्या काही स्थावर, जंगम मिळकतींचा लिलाव होऊन ठेवीदारांना, गुंतवणूकदारांना पैसे मिळतील अशी आशा आहे. पैशाची मागणी कायदेशीररीतीने रहावी, यासाठी पीडित महिलेने अ‍ॅड. मिलिंद पवार, अ‍ॅड. योगेश पवार व अ‍ॅड. अजय ताकवणे यांच्या वतीने पुणे येथील दिवाणी न्यायालयात वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात दिवाणी स्वरूपाचा दावा दाखल केला आहे.