धक्कादायक ! भाच्याचा धावण्याच्या स्पर्धेतील ‘विजय’ फायरिंग करून केला साजरा (व्हिडीओ)

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन  – ५० किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेतील भाचा विजयी झाला. विजयी होऊन घरी आलेल्या भाच्याचे गोळीबार करुन आनंद साजरा करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याची मोठी चर्चा परिसरात सुरु झाली आहे. मात्र, पोलिसांकडून अद्याप काहीही कारवाई करण्यात आलेली नाही.

ही स्पर्धा रविवारी झाली होती. स्पधेतील ५० किलोमीटर धावण्याच्या स्पधेत विजयी झालेला स्पर्धक तरुण घरी गेला. त्यावेळी त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. महिलांनी औक्षण करुन त्याला शुभेच्छा दिल्या. विजेत्या तरुणाच्या नातेवाईकाने आपल्याकडील डबल बोअर बंदुकीतून दोन वेळा गोळीबार करुन एकूण चार गोळ्या हवेत झाडल्या. एका पाठोपाठ एक गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी भीतीपोटी दरवाजे बंद करुन घेतले.

या गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल झाला असून त्यात या तरुणाच्या नातेवाईक महिलेने गोळीबाराचा व्हिडिओ तयार केला आहे. त्यात तिने स्वत: अंकरिंग केले आहे. त्यात धावण्याच्या स्पर्धेमध्ये माझा भाचा विजयी झाला आहे. त्याचे स्वागत करीत आहे, असे सांगितले. त्याचवेळी हा तरुण त्यांच्या नातेवाईकाबरोबर येतो. नातेवाईक त्याच्याकडील बंदुकीतून दोन गोळ्या झाडतो.

त्यानंतर या विजयी तरुणाचे औक्षण करत असताना तो नातेवाईक आणखी दोन गोळ्या हवेत झाडताना दिसत आहे. या नातेवाईकांकडे बंदुकीचा परवाना असल्याचे समजते. मात्र, परवाना असला तरी त्यातून सावर्जनिक जागेत असा गोळीबार करणे आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेले नाही.