विदर्भात युतीमुळे होणार शिवसेनेचे उखळ पांढरे ; होणार ‘या’ जागी फायदा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘वऱ्हाड अन् सोन्याची कुऱ्हाड’ हि विदर्भच्या बाबतीत वापरली जाणारी म्हण आता शिवसेनेसाठी खरी ठरणार आहे. कारण सेना-भाजप युती झाल्यामुळे शिवसेनेला सर्वाधिक फायदा हा विदर्भात होणार आहे. अर्थात शिवसेनेला भाजप सोबत केलेल्या युतीमुळे सोन्याची कुऱ्हाड प्राप्त होणार आहे. विदर्भातील अमरावती,यवतमाळ,बुलढाणा आणि रामटेक या शिवसेनेने गत निवडणुकीत जिंकलेल्या जागा. या हि वेळी शिवसेनेच्याच ताब्यात राहण्यास भाजपची अमूल्य मदत शिवसेनेला होणार आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ
अमरावती लोकसभा मतदारसंघ म्हणजे भारताचे पहिले कृषी मंत्री पंजाबराव देशमुख, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील अशा तगड्या काँग्रेसच्या नेत्यांनी प्रतिनिधित्व केलेला मतदारसंघ. आता शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून उदयाला येतो आहे. अनंतराव गुडे यांनी दोन वेळा आणि आनंदराव अडसूळ यांनी दोन वेळा असे चार वेळा शिवसेनेने या जागेचे प्रतिनिधित्व केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीला या मतदारसंघात माजी मंत्री मुकुल वासनिक हे उमेदवारी करण्याची शक्यता आहे. युती झाली नसती तर त्यांना रोखण्यासाठी शिवसेनेची ताकद कमी पडली असती. म्हणून या ठिकाणी शिवसेनेला भाजपची खूप मदत होणार आहे.

यवतमाळ लोकसभा मतदारसंघ
यवतमाळ मतदारसंघात भाजपची ताकद मोठी आहे. मात्र मागील निवडणुकीत जी जागा शिवसेनेने जिंकली ती जागा शिवसेनेकडे आणि जी भाजपने जिंकली ती भाजपकडे असे युतीचे समीकरण ठरल्याने हि जागा शिवसेनेकडे राहणार आहे. या मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी या खासदार आहेत. त्यांनाच यावेळी उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना काँग्रेस आघाडी करून तगडे आव्हान मिळण्याची शक्यता आहे.

बुलढाणा लोकसभा मतदारसंघ
बुलढाणा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेने पाच वेळा प्रतिनिधित्व केले आहे. भाजप सोबत शिवसेनेने युती केली नसती तर हा मतदारसंघ राष्ट्रवादीने अलगद जिंकला असता. एवढी शिवसेनेची पकड या मतदारसंघात ढिल्ली झाली आहे. प्रतापराव जाधव या शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर येथील लोक नाराज आहेत. राष्ट्रवादीने हा मतदारसंघ जिंकण्याचा चंग बांधून कामाला सुरुवात केली आहे. तर स्वाभिमानी शेतकरी संघटना हि या मतदासंघातून निवडणूक लढून जिंकण्याचा दावा करत आहे.एकंदर या मतदारसंघात शिवसेनेसाठी लढाई सोपी नाही. परंतु भाजप सोबत युती झाल्याने त्यांना बळ मात्र निश्चित मिळाले आहे.

रामटेक लोकसभा मतदारसंघ
माजी पंतप्रधान पी.व्ही नरसिंह राव यांनी प्रतिनिधित्व केलेला हा मतदारसंघ मागच्या काही निवडणुकीत शिवसेनेने आपल्या नावे केला. शिवसेनेचे कृपाल तुपाने या मतदारसंघातून गत वेळी लोकसभेवर निवडून गेले. यावेळी युती झाली नसती तर हा मतदारसंघ भाजपने हमखास जिंकला असता कारण या मतदारसंघात फक्त खासदारच शिवसेनेचा अशी अवस्था आहे. कारण मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्था पासून सर्वच ठिकाणी भाजपचे कमळ फुलले आहे. अशा अवस्थेत युतीचा सर्वात जास्त फायदा कोणत्या मतदारसंघात झाला असेल तर तो रामटेक लोकसभा मतदारसंघ आहे. म्हणून येत्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार या मतदारसंघात सहज निवडणूक जिंकू शकतो अशी स्थिती सध्या तरी या ठिकाणी पाहण्यास मिळते आहे.

भाजप शिवसेना युतीला विरोधकांनी आणि सोशल मीडियाने जरी घेरले असले तरी जनमत त्यांच्या बाजून अनुकूल आहे याची प्रचिती आगामी काळात येणार आहे. शिवसेनेला भाजप सोबत युती करण्याचा फायदा झाला आहे. तर भाजपला फक्त मत विभाजन टाळण्यासाठीच शिवसेनेची मदत होणार आहे असे मत राजकीय जाणकारांनी व्यक्त केले आहे.