हिंगणघाट जळीत प्रकरण : पिडीतेचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी सुचवला ‘हा’ उपाय

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेत प्राध्यापिका 40 टक्के भाजली असून तिच्यावर नागपूरच्या ऑरेंजसिटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यासाठी पुढील 48 तास महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेमध्ये पीडित महिलेची श्वसननलिका भाजली असल्याने तिला श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत आहे. कृत्रिम पाईप टाकून डॉक्टरांनी तिचा श्वास पुन्हा सुरु केला असून धोका अद्याप टळला नाही.

या घटनेमध्ये पीडित महिलेचा चेहरा आणि पूर्ण डावा हात मोठ्या प्रमाणात भाजला आहे. तसेच श्वसन नलिकेत धूर गेल्याने तिला श्वसनाचा त्रास होत असल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे असून तिच्यावर प्लॅस्टिक सर्जरी करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितलंय. अशा रुग्णांना इन्फेक्शन हे लवकर होतं त्यामुळे अतिशय काळजी घ्यावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितलयं. दरम्यान, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी पीडित प्राध्यापिकेच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार असल्याचे सांगितले.

काय आहे प्रकरण ?
एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जाळण्यात आले. चेहऱ्यावर पेट्रोल ओतल्यामुळे पीडिता गंभीर जखमी झाली आहे. या हल्ल्यामध्ये तिचा संपूर्ण चेहरा जळाला असून तिची वाचा आणि दृष्टी गेली असल्याची खळबळजनक माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या प्रकरणात आरोपी विकेश नगराळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून सत्य काय ते अद्याप बाहेर आले नाही. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधिक्षक बसवराज तेली यांनी हिंगणघाट येथे दाखल होऊन घटनेची माहिती घेतली. या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

You might also like