दुर्देवी ! सामना’वीर’ ठरलेल्या क्रिकेटपटूवर काळाचा घाला, भीषण अपघातात दोघे जागीच ठार

यवतमाळ : पोलीसनामा ऑनलाइन – यवतमाळ येथे आयोजित सामना खेळून वर्ध्याकडे परतणार्‍या दोन छोट्या क्रिकेटपटूंचा भीषण अपघातात मृत्यू झाला. जयेश प्रवीण लोहिया (10, रा. रामनगर वर्धा) अक्षद अभिषेक वैद (11, रा. वर्धा) अशी त्यांची नावे आहेत. ते दोघे वर्ध्यातील ब्रदर हूड क्रिकेट क्लबचे खेळाडू होते. हा अपघात शनिवारी चापडोह पुनर्वसनजवळ नागपूर-तुळजापूर राज्य महामार्गावर झाला.

यवतमाळमधील पद्मविलास क्रिकेट क्लबने गोधणी मार्गावर टी-20 सामन्यांचे आयोजन केले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वर्ध्यातील ब्रदर हूड क्लबचे क्रिकेटपटूही गेले होते. यामध्ये अक्षद आणि जयेशही होते. हे दोघे त्यांच्या पालकांसह कारमधून याठिकाणी गेले होते. सामना आटोपून ते वर्ध्याकडे निघाले होते. मृत जयेशचे वडील प्रवीण लोहिया हे कार चालवत होते. गोधणी मार्गातून घाटंजी बायपास येथून नागपूरकडे जात असताना चापडोह गावाजवळ त्यांची कार दुभाजकावर आदळली. या भीषण अपघातात जयेश आणि अक्षद या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. तर कारमधील अन्य लोकही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये दर्श सुमित आचलीया (11), रोमित अजय गलांडे (11) तसेच मृत जयेशचे वडील प्रवीण मोहन लोहिया (40) आणि अतुल प्रकाश केळकर (40) यांचा समावेश आहे. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

जयेश ‘मॅन ऑफ द मॅच’
यवतमाळमध्ये जयेश आणि अक्षदच्या टीमने जी मॅच खेळली, त्यामध्ये जयेश मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्याने या 6 बळी घेतले होते. संघाला विजय मिळवून देण्यात त्याची ही कामगिरी मोलाची ठरली होती. हा सामना आटोपल्यानंतर ते वर्ध्याकडे परतण्यासाठी निघाले असताना त्यांच्या कारला भीषण अपघात झाला आणि जयेश आणि अक्षदवर काळाने झडप घातली.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/