Video : पोलिसांना शिवीगाळ करणाऱ्याचा ‘त्या’ व्यक्तीचा 24 तासांत उतरला ‘माज’ अन् मागितली जाहीर माफी; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुलुंडच्या आरआरटी रोडवर नो पार्किंगमध्ये एका व्यक्तीने दुचाकी पार्क केली होती. त्यामुळे वाहतूक पोलीस कारवाई करताना त्या व्यक्तीने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्याने रागाच्या भरात पोलिसांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अनेकांनी या घटनेचा निषेध करत संताप व्यक्त केला. पोलिसांशी घातलेला वाद पाहून अनेकांनी संबधितावर कठोर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर 24 तासांत त्याचा माज उतरला अन् त्याने दुसरा व्हिडीओ बनवून पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे.

जतीन सतरा असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंबई पोलिसांच्या कार्याला मी सलाम करतो. ज्यांना माझ्या कृत्याने वाईट वाटले अशा सर्वांची मी मनापासून माफी मागतो असे त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे. मुलुंडकर या फेसबुक पेजवरून व्हिडीओ शेअर केला आहे. आरआरटी परिसरात उभ्या केेलेल्या गाड्यांवर वाहतूक पोलीस कारवाई करत होते. त्यावेळी जतीनच्या बाईकवर कारवाई करताना पोलिसांनी त्याच्या गाडीच्या नंबरचा फोटो काढला. त्यावेळी जतीनने त्याना रोखले. त्यावेळी जतीनने रागाच्या भरात वाहतूक पोलीस ज्ञानेश्वर वाघ आणि गोरख सानप यांना अर्वाच्च भाषेत सुनावत दोघांच्या अंगावर धावून गेला. तेंव्हा जतीनसोबत असणाऱ्या तरूणाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. परंतु रागाच्या भरात जतीन पोलिसांसोबत गैरवर्तवणूक करत राहीला. या प्रकरणाची दखल पोलिसांनी घेत जतीन सतराविरोधात गुन्हा नोंदवला. वाहतूक पोलिसांशी घातलेली हुज्जत पाहून अनेकांनी जतीनवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. त्यानंतर व्हिडीओ बनवून पोलिसांची जाहीर माफी मागितली आहे. दरम्यान, त्याला एका गुन्हयात जामीन मिळाला असला तरी एका जातीचा उल्लेख केल्यामुळे त्याच्याविरूध्द अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.