ठाण्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – ठाणे शहरात शिरलेल्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आले आहे. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर वन विभागानं ही कामगिरी केली आहे. ‘सत्कार’ हॉटेलच्या बेसमेंटमधून या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, वा येऊर परिसरातून हा बिबट्या ठाणे शहरात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ठाण्यातील दाट लोकवस्ती असलेल्या शहरी भागात बिबट्याने प्रवेश केल्यामुळे खळबळ उडाली होती. मध्यरात्री बिबट्याने कॅडबरी कंपनीत प्रवेश करताना काहीजणांनी पाहिले. यानंतर बिबट्या प्रसिद्ध कोरम मॉलच्या परिसरातील पार्किंगमध्ये शिरल्याचे स्पष्ट झाले. मात्र मॉलच्या संरक्षक भिंतींवरून पहाटे ५.२९ वाजता बिबट्या बाहेर गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे. त्यापुढे हा बिबट्या ठाण्यातील वसंत विहार परिसरात असल्याचे सांगितले जात होते.

दरम्यान मॉलमध्ये बिबट्या शिरल्याचे कळताच अग्निशामक दलाला याठिकाणी पाचारण करण्यात होते. त्यानंतर तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून विनविभागामार्फत संपूर्ण मॉलची पाहणी करण्यात आली होती. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे अधिकारी, वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, सीसीटीव्ही फूटेज तपासल्यानंतर मध्यरात्री पार्किंगमध्ये शिरलेला बिबट्या पहाटे ५ वाजून २९ मिनिटांनी मॉलची संरक्षक भिंत ओलांडून निघून गेल्याचे स्पष्ट झाले.

‘कोरम’ मॉलच्या पार्किंगमध्ये शिरलेला बिबट्या नंतर सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये लपून बसल्याची माहिती मिळाली. परंतु या ठिकाणाहून बिबट्याला पकडणे हे एक मोठे आव्हान वन अधिकाऱ्यांपुढे होते. यानंतर त्याला पकडण्यासाठी पिंजरे मागवण्यात आले. यानंतर काही तासांच्या प्रयत्नानंतर वन अधिकाऱ्यांनी भूल देत अखेर बिबट्याला जेरबंद केले. यानंतर सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला. बिबट्याच्या वावरामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. अखेर त्याला जेरबंद केल्यानंतर ठाणेकरांनी त्याला पाहण्यासाठी सत्कार हॉटेल परिसरात मोठी गर्दी केली होती.