Mumbai News : मानखुर्द येथे भंगाराच्या सामानाला भीषण आग

मुंबईः पोलीसनामा ऑनलाईन – मानखुर्द घाटकोपर लिंक रोडवरील मंडाला येथे झोपडपट्टीच्या बाजूला असलेल्या भंगारच्या सामानाला शुक्रवारी (दि. 5) दुपारी भीषण आग लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी घटनास्थळी अग्निशमनच्या दलाच्या 14 गाड्या पोहचल्या आहेत. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने आणखीही गाड्या रवाना झाल्या आहेत.

दरम्यान ज्या परिसरात आग लागली आहे. त्याच्या शेजारीच झोपडपट्टी आणि डंपिंग ग्राऊंड असल्याने भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीचा भडका उडाल्याने परिसरातील अनेकांची धावपळ उडाली. अग्निशमन दलाच्या जवानांकडून भडकलेली आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.