देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीवर शरद पवारांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंढरपुरात वार्ताहरांशी बोलताना शरद पवार यांनी भेटीचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे.

शरद पवार म्हणाले, संजय राऊत यांनी पहिली मुलाखत माझी घेतली, त्यांनी त्या मुलाखतीत सांगितलं, यानंतर मी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेणार, भाजप नेत्यांची मुलाखत घेणार आहे. वृत्तपत्रांनी वेगवगेळ्या पक्षांच्या नेत्यांची मुलाखत त्यांच्या पत्रकारांनी किंवा संपादकांनी घेतली तर लगेच त्याची तडजोड पक्षासोबत होत नाही. त्यामुळे अधिक भाष्य करण्याची गरज नाही, मुलाखत घेतील, छापतील पण राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही, त्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

संजय राऊत काय म्हणाले ?

आमच्या भेटीवर कोणी नाराज नाहीत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना मी मागील वर्षी भेटलो. त्यातून काही जण नाराज झाले होते. पण त्यामुळेच राज्यात महविकास आघाडीचे सरकार आलं. विरोधी पक्षातील नेत्यांना भेटायचं नाही असा कायदा आहे का ?. दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होतच असते. राज्यातील सरकार पाच वर्ष टिकणार आहे. यामुळे पुढील वर्षे विरोधकांना काही काम नाही, अशी कोपरखळी राऊतांनी लगावली.

संजय राऊत यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणतात…

सांताक्रूझच्या ग्रँड हयातमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात रविवारी सुमारे २ तास चर्चा झाली. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. तथापि, या भेटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवास्थानी झालेल्या बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी भाजप शिवसेनेनेसोबत युती करणार नाही, शिवसेनेसोबत हात मिळवण्याची इच्छा नसल्याचं पत्रकारांशी बोलताना सांगितलं.