Video : महिलेनं चक्क साडी नेसून केलं ‘स्कीइंग’ ! तुफान व्हायरल झाला व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेतील एका जोडप्यानं चक्क साडी आणि धोतर नेसून बर्फावरील स्कींइंग केलं आहे. सध्या या कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.

अमेरिकेच्या मिनेसोटा येथील भारतीय वंशाच्या एका जोडप्यानं हे स्कीइंग केलं आहे. व्हिडीओत दिसणाऱ्या मुलीचं नाव दिव्या मैया आहे. दिव्या आणि तिच्या पार्टनरनं बर्फावरील स्कीइंग करण्याचा निर्णय घेत तिथल्याच वेल्च या गावातील पर्वतरांगांमध्ये दोघांनी स्कीइंग करायचं ठरवलं. यात त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. म्हणून त्यांनी साडी आणि धोतर नेसून स्कीइंग करण्याचं ठरवलं.

दिव्यानं याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. मी 10 वीच्या निरोप समारंभात पहिल्यांदा साडी नेसली होती. परंतु महिलांनी साडी नेसून बॅकफ्लिप आणि क्रिकेट खेळल्याचं पाहून मीही साडी नेसून स्कीइंग करण्याचा निर्णय घेतला. एक इंफ्लूएंसर म्हणून नाव होत असताना वेगळं वाटत आहे असंही दिव्यानं सांगितलं.

जोडप्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी यावर कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ शेअरही केला आहे.