Video : हिंसक शेतकऱ्यांच्या जमावातून ‘त्या’ वृद्धाने पोलिसाला काढले सुखरुप बाहेर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या 70 दिवसांपासून कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन करणारे शेतकरी प्रजासत्ताक दिनी (मंगळवारी) दिल्लीच्या तख्तावर पोहोचले आहेत. दिल्लीत सध्या पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये मोठा संघर्ष सुरु आहे. आंदोलक ट्रॅक्टर आणि घोड्यावर स्वार होऊन हातात लाठीकाठी आणि तलवारी घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. त्यातच काही शेतकरी आंदोलकांनी पोलिसांवर तलवारी उगारल्याने परिस्थिती चिघळली आहे. दरम्यान एक व्हिडीओ समोर आला असून यात पोलीस जवान हिंसक शेतकऱ्यांच्या जमावात सापडतो, मात्र एक वृद्ध शेतकरी त्या पोलिसाला सुरक्षितपणे जमावातून बाहेर काढताना दिसून येत आहे. दक्षिण दिल्ली परिसरात हा प्रकार घडला आहे.

शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढला असून या मोर्च्याला हिंसक वळण लागले आहे. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. राजपथावरील परेड पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे. मात्र पोलिसांची मुभा नसलेल्या दुसऱ्या मार्गाने शेतकरी दिल्लीत प्रवेश करत असल्याने दिल्लीत लाल किल्ला परिसरात अनेक ठिकाणी शेतकरी आणि पोलीस यांच्यात संघर्ष होत आहे. यातच एक व्हिडीओ समोर आला असून यात संतप्त शेतकरी आंदोलकांमध्ये अडकलेल्या एका पोलिसाची सुटका करण्यासाठी एका वृद्ध शेतकऱ्याने धाव घेतली. या परिस्थितीत हा पोलीस जवान संतप्त शेतकऱ्यांच्या तावडीत सापडल्याने आंदोलक त्याच्यावर हल्ला करतील अशी भीती तो व्हिडीओ पाहताना वाटत होती. मात्र एका वृद्ध शेतकऱ्याने हिंसक जमावाला समजावून त्या पोलिसांची सुखरूप सुटका केली आहे.