Video : अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगताना PM मोदींची अश्रूंचा फुटला बांध, पाहा ‘तो’ व्हिडीओ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोमवारी राज्यसभेत राष्ट्रपती अभिभाषणावर संबोधित केल्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेला संबोधित केले. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद यांच्यासह चार खासदारांचा आज संसदेतला शेवटचा दिवस आहे, त्यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुलाम नबी आझाद यांचं कौतुक केले, त्याचसोबत आझाद यांच्यासोबत घडलेल्या एका घटनेवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भावूक झाल्याचे दिसून आले. पंतप्रधान मोदींच्या भाषणांनंतर सभागृह स्तब्ध झाल्याचे पहायला मिळालं. मोदींनी सांगितलेल्या त्या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.

काय होती ती घटना ?
जुलै 2007 मध्ये गुजरातमधील काही पर्यटक काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. श्रीनगर जवळ असताना यात्रेकरुंच्या बसवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. ही बस मुघल गार्डनच्या दिशेनं जात असताना हा हल्ला झाला होता. यामध्ये 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर काही जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. हा हल्ला झाला त्यावेळी गुलाम नबी आझाद जम्मू काश्मीरचे मुखमंत्री होते. या घटनेनंतरचा एक हृदयद्रावक व्हिडीओ असून, यामध्ये जखमींना मदतीसाठी धावणारे आणि त्यांचे सात्वंन करताना आझाद दिसत आहे. जखमींचे मृतदेह आणि नातेवाईकांना हवाई दलाच्या विमानात टाकल्यानंतर आझादांनी माफी मागितली. फुलं-फळं देऊन परत पाठवणार होतो, पण… मुलांचे मृतदेह… आम्हाला माफ करा, असं म्हणत आझादांनी हात जोडले होते. हे सांगताना त्यांचा कंठही भरुन आला होता.

राज्यसभेत मोदी काय म्हणाले ?
एका दहशतवादी घटनेनंतर गुलाम नबी आझाद यांच्यासोबत फोनवरुन झालेल्या संवादाचा उल्लेख करत मोदी भावूक झाले, आझाद यांचं कौतुक करताना ते म्हणाले की, त्यांच्या घराच्या परिसरातील बगीचा पाहून काश्मीरची आठवण होते, गुजरातच्या पर्यटकांवर जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, तेव्हा सर्वात आधी गुलाम नबी आझाद यांचा फोन आला, तो फोन फक्त सूचना देण्यासाठी नव्हता. त्यावेळी त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते, त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो, आपल्या कुटुंबातील सदस्यांची जशी चिंता असते तशी चिंता गुजरातच्या लोकांबद्दल आझाद यांना होती, असे मोदी म्हणाले.

या हल्ल्यात 8 लोक मारले गेले होते, तेव्हा प्रणब मुखर्जी संरक्षण मंत्री होते, मी त्यांना या पर्यटकांचे मृतदेह गुजरातमध्ये आणण्यासाठी संरक्षण खात्याच्या एअरप्लेनची मागणी केली, प्रणब मुखर्जी यांनी सांगितले चिंता करु नका, रात्री खूप उशीर झाला होता, पुन्हा गुलाम नबी आझाद यांचा मला फोन आला. ते एअरपोर्टवर होते, आपल्या कुटुंबाप्रमाणे त्यांची त्या सदस्यांची काळजी घेतली… अशी चिंता… म्हणत ते वाक्य नरेंद्र मोदी पूर्ण करु शकले नाही, त्यांना गहीवरुन आले.