Video : ‘आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है’, राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशाचा आज ७४ वा स्वातंत्रदिवस आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केलं. त्यानंतर त्यांनी लाल किल्ल्यावरुन देशवासियांना संबोधित केलं.देशवासिय आज अनेक संकटासोबत लढत आहेत. कोरोना, पूर भूस्खलन आदी संकटांमध्ये जीव गमावलेल्या कुटूंबीयांना आम्ही मदत करत असल्याचं त्यांनी सांगितलं. कोरोना कालखंडात कोरोना योद्धयांनी देशवासीयांची सेवा केली आहे. त्या सर्वांना नमन करतो, असे देखील पंतप्रधान म्हणाले.

दरम्यान, पुण्यात जिल्ह्याचे मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते पार पडलं. विधानभवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार गिरीश बापट, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, संदीप विष्णोई, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे यांच्या सह स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, कोरोना योद्धे उपस्थिती होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पुण्यात आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतास उपमुख्यमंत्री अजित पवार उभे होते. त्यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी, ‘आपके राज्य में हम आपकी बिना परमिशन के आ गए है’, असे म्हणत कोपरखळी लगावली. तेवढ्यात अजित पवारांनी हात जोडून ‘असे काही नाही’ म्हणत स्वागत केले. राज्यपालांच्या या टोल्यावरुन राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

राज्यपाल कोश्यारी यांना अजित पवारांचा पुणे जिल्ह्याच्या राजकारणावरील वचक माहिती आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांना फटकारल्यानंतर अजित पवार नाराज असल्याचे बोललं जात आहे. तसेच कुटूंबीयांशी चर्चा करुन पार्थ पवार पुढील निर्णय जाहीर करणार असल्याचं देखील सांगितलं जातं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज बारामतीमध्ये संपूर्ण पवार कुटूंबाची बैठक देखील बोलावली आहे