कंगना रनौत आक्रमक, म्हणाली – ‘सर्वांसमोर तमाशा सुरू आहे, आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना जेलमध्ये टाका’ (व्हिडीओ)

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  गेल्या २ महिन्यांपेक्षा जास्त काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहे. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली आहे. मात्र, काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहण्यास मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये ट्रॅक्टर रॅली काढली आहे.

मात्र, आंदोलक शेतकरी आणि पोलीस काही ठिकाणी आमने-सामने आले. हे शेतकरी आंदोलन चिघळल्याचे दिसून येत आहे. आंदोलक शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीत प्रवेश करत लाल किल्ल्यावर कब्जा केला आहे. तसेच या ठिकाणी शेतकऱ्यांनी आपला झेंडा फडकवला आहे. दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटला आहे. एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचं चित्र आहे. तलवार आणि काठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाचं दृश्य पहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणैत हिने प्रतिक्रिया दिली आहे.

कंगना रणैत म्हणाली की, आज प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर हल्ला करण्यात आला. तिथे खलिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला आहे. कोरोना संकटावर आपण यशस्वी मात करत पुढे गेलो. याशिवाय या संकट काळात आपण पूर्ण जगाचं प्रतिनिधित्व करत आहोत. मोजक्याच देशांना हे यश मिळालं आहे. त्याच देशांपैकी आपण एक आहोत, लाल किल्ल्याचे फोटो येत आहेत. हे दहशतवादी जे स्वत: ला शेतकरी म्हणतात त्यांना प्रोत्साहन दिलं जात आहे. सर्वांसमोर हा तमाशा सुरु आहे, अशी टीका कंगनाने केली आहे. आज जगात आपली थट्टा होत आहे. आपली काहीच इज्जत राहिलेली नाही. जेव्हा दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष देशात येतो तेव्हा काही लोकं नागडं होऊन बसतात. या देशाचं काहीच होणार नाही. कुणी या देशाला एक पाऊल पुढे घेऊन जात आहे, तर काही लोक देशाला दहा पावलं मागे खेचत आहेत. त्या सर्व शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांचं समर्थन करणाऱ्यांना जेलमध्ये टाका. त्यांची संपत्ती देखील हिसकावून घ्या, असं कंगनाने व्हिडिओद्वारे सांगितलं.

दरम्यान, आंदोलन हिंसक वळण घेत असल्याने दिल्ली मेट्रोच्या अनेक स्थानकांचे प्रवेश आणि बाहेर येणारे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र हे हिंसक आंदोलन अजून पेटू नये म्हणून अफवांना आळा बसावा आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाकडून संबंधित भागातील इंटरनेट सेवा आणि टेलिकॉम सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही सेवा आज रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहील.