Video : राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये गेलेल्या मोहिते-पाटलांच्या ओठांवर अजूनही आपलं ‘घड्याळ’चं ?

माढा : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करून काही दिवसांपुर्वी मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलेल्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सांगोला येथे झालेल्या प्रचारसभेत चुकून घडयाळाला मतदान करण्याचे आवाहन केले आणि उपस्थितांमध्ये हश्या पिकला. राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतर देखील रणजितसिंहांच्या ओठांवर अजूनही घडयाळच असल्याचे उपस्थितांना पहावयास मिळाले आणि म्हणुनच की काय अनेकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली. मात्र, ओठांवर चुकून घडयाळ आल्याने रणजितसिंहांनी दोन्ही हात जोडले.

पाण्याच्या प्रश्‍नसाठी आपल्याला एकत्र यायचं आहे. ज्यानं आपल्या पाण्याला विरोध केला आहे, त्याला आपल्याला उभं करायचं नाही. जो आपल्या पाण्याला तसेच भविष्याला पाठिंबा देणार आहे, त्याच्या पाठीशी आपल्या सगळयांना उभे रहायचे असल्याचे रणजितसिंह यावेळी म्हणाले. त्यानंतर बोलातना ते म्हणाले, उद्याच्या दि. 23 एप्रिलला आपलं घडयाळ असे म्हणताच उपस्थितांमध्ये हश्या पिकला. आपली चुक लक्षात आल्यानंतर रणजितसिंहांनी उपस्थितांसमोर दोन्ही हात जोडले आणि पुन्हा दुरूस्ती केली. माढा लोकसभा मतदार संघातुन राष्ट्रवादीकडून संजयमामा शिंदे तर भाजपाकडून रणजितसिंह नाईक-निंबाळकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत. नाईक-निंबाळकरांच्या प्रचारासाठी सांगोला येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्याकडून ही चुक झाली आहे. सध्या रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.