नागपूरच्या रस्त्यावरील थरार ! पोलीस हवालदाराला कारच्या बोनेटवरून फरफटत नेले, कारचालकाला अटक, मैत्रिणीवर FIR दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –  वाहतुकीचे नियम तोडल्याप्रकरणी कारवाईसाठी पुढे आलेल्या वाहतूक पोलिसाला चक्क कारच्या बॉनेटवर बसवून दुचाकींना धडक मारत फरफटत नेणाऱ्या कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (दि. 29) सायंकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास नागपुरातील सक्करदरा चौक ते राजे रघुजी मार्गावर हे थरारनाट्य घडले होते. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी आकाश चव्हाण ( रा. केळापूर, जि. यवतमावळ) याला अटक केली आहे, तर त्याची मैत्रीण पल्लवी देशमुख हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे, तर अमोल चिंदमवार असे कारवाईसाठी पुढे आलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून पुढे जात असलेल्या आरोपी चव्हाणची कार हवालदार चिंदमवार यांनी रोखण्याचा प्रयत्न केला होता. तो थांबत नसल्याचे पाहून हवालदार अमोल कारसमोर उभे झाले. आरोपी चव्हाण याने त्यांना न जुमानता तशाच अवस्थेत कार दामटली. हवालदार अमोलही बोनेटवर चढले. त्या अवस्थेत सुमारे100 मीटर अंतरापर्यंत चव्हाणने आपली कार काही दुचाकींना धडक मारत दामटली. वर्दळीच्या मार्गावर हे थरारनाट्य घडत असल्याचे पाहून नागरिकांनी धाव घेतली आणि चव्हाणची कार थांबवली. त्याला बाहेर खेचत त्याची बेदम धुलाई केली. नंतर सक्करदरा पोलिसांनी आरोपी चव्हाण तसेच त्याची मैत्रीण पल्लवी या दोघांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. आरोपी चव्हाण याला अटक केली आहे.