शिवाजीराव देशमुखांच्या निधनाने रिक्त जागेसाठी ‘या’ तारखेला पोटनिवडणूक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस सदस्य शिवजीराव देशमुख यांचे १४ जानेवारी २०१९ रोजी निधन झाले होते. त्यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेतील आमदार या पोटनिवडणुकीत मतदान करणार आहेत.

७ जूनला होणार पोटनिवडणूक

विधानसभेतील संख्याबलामुळे लढत एकतर्फी होऊन सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या महायुतीला ही जागा मिळण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. येत्या ७ जून रोजी या जागेकरिता पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेच्या २८८ जागांपैकी भाजपचे १२० तर शिवसेनेचे ६० आमदार आहेत. तर काँग्रेसचे ४२ आणि राष्ट्रवादीचे ४० आमदार आहेत. ४ अपक्षांसह छोट्या पक्षांचे १३ आमदार आहेत. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना -भाजप महायुती ही काँग्रेस -राष्ट्रवादीला वरचढ ठरणार आहे.

आमदार शिवाजीराव देशमुख यांचं १४ जानेवारी २०१९ रोजी वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झाले होते. संबंधित जागेवरील सदस्याचा कार्यकाळ २४ एप्रिल २०२० रोजी संपणार आहे. त्यामुळे पोटनिवडणुकीत विजयी होणाऱ्या उमेदवाराला केवळ ११ महिनेच कामकाजाची संधी मिळेल.