मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ठाकरे कुटुंबातील दुसरे ठाकरे विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. राज्यात २१ मे रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. यापूर्वी आदित्य ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. विधानपरिषद निवडणुकीचा अर्ज भरताना उद्धव ठाकरे यांनी त्यांची संपत्ती जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. मात्र, निवडणूक आयोगाने विधानपरिषद निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा केल्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेतून निवडून जाण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. यात शपथ पत्रासोबत त्यांनी संपत्तीचे विवरण दिले आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्याकडे जवळपास १२५ कोटी रुपयांची संपत्ती असल्याचं समोर आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे स्वतःचे वाहन नाही. तसंच मातोश्री आणि मातोश्रीच्या समोर निर्माणाधीन असलेली दोन घरे आणि कर्जतमध्ये एक फार्महाऊस आहे. त्यांनी उत्पन्नाचे साधन हे विविध कंपन्यांच्या शेअर्स मधून येणार डिव्हीडंट, भागीदारी असल्याचं म्हटलं आहे. हे प्रतिज्ञापत्र अद्याप निवडणूक आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलं नसून एका वृत्तवाहिनीला सूत्रांनी याची माहिती दिली आहे. याआधी आदित्य ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीवेळी उमदेवार अर्ज भरताना संपत्तीचे विवरण दिले होते. तर उद्धव ठाकरेंचं शपथपत्र लवकरच निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलं जाणार आहे.
उद्धव ठाकरेंवर दाखल असलेले गुन्हे?
उद्धव ठाकरे यांच्यावरती पोलिस ठाण्यात एकूण २३ प्रकरणे नोंद आहे. त्यापैकी १२ प्रकरणं रद्द झाली असून अन्य प्रकरणे खासगी तक्रारी आहे. केवळ एकच प्रकरण सध्या त्यांच्या नावावरती आहे. नारायण राणे यांनी शिवसेना सोडल्यानंतर सामना कार्यालयाबाहेर राडा झाला होता. त्याची नोंद ठाकरेंच्या नावावर आहे.
आदित्य ठाकरेंची संपत्ती किती?
वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरेंनी प्रचंड शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यावेळेस त्यांच्यासोबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. आदित्य यांनी उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र दाखल केलं. त्यानुसार त्यांच्याकडे एकूण ११ कोटी ३८ लाखांची संपत्ती आहे. यामध्ये १० कोटी ३६ लाखांच्या बँक ठेवींचा समावेश आहे. आदित्य यांच्याकडे ६४ लाख ६५ हजार रुपयांचे दागिने आणि २० लाख ३९ रुपयांचे बॉन्ड्स आहे.