भाजपकडून विधान परिषद विरोधीपक्षनेतेपदासाठी ‘या’ नेत्यांमध्ये रस्सीखेच

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीत सर्वांत जास्त जागा मिळूनही भाजप पक्षाला विरोधी बाकड्यावर बसावे लागले. त्यामुळे विधानसभेत विरोधीपक्षनेतेपदी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. आता त्यानंतर विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेतेपदासाठी भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

याआधी २०१४ ते २०१९ या कालावधीत चंद्रकांत पाटील हे भाजपच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी होते. मात्र ते आता विधानसभेत दाखल झाल्याने विधान परिषदेत विरोधीपक्षनेते पदासाठी पक्षांतर्गत चढाओढ सुरू आहे. यामध्ये विदर्भातील डॉ. परिणय फुके यांचे नाव आघाडीवर असून सोबतच प्रसाद लाड, प्रवीण दरेकर आणि भाई गिरकर यांचे नावही चर्चेत आहेत.

दरम्यान, विधान परिषदेत भाजपचे २२ सदस्य असून रासप आणि दोन अपक्षांचे भाजपला समर्थन आहे. याआधी भाजपकडून विधान परिषदेचे विरोधीपक्षनेतेपद नितीन गडकरी आणि भाऊसाहेब फुंडकर या विदर्भकरांनी भुषवलेले आहे. त्यात डॉ. फुके हे देखील विदर्भातील असल्याने यांना ही संधी मिळणे कठीण दिसत त्यांच्याऐवजी भाई गिरकर यांचेही नाव चर्चेत आहे.

पोलीसनामाचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/