विधानसभा 2019 : परराज्यातून महाराष्ट्र्रात आणलेली 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून ही रणधुमाळी रंगात येण्याआधीच कांदिवलीत नाकाबंदी दरम्यान एका कारमधून 1 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रोकड परराज्यातून मुंबईत आणण्यात आली असून या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकासह नऊ जणांना अटक केली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे सापडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
समतानगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमध्ये अमित कांतीलाला सेठ (वय-49 रा. माणिकबाग सोसायटी, अहमदाबाद, गुजरात), एजंट राकेश ठक्कर (वय-45 रा. पालघर), रियल इस्टेट व्यवसायिक संजय यशवंत सावंत (वय-48 रा. नवी मुंबई), ब्रोकर रशिश पुजीलाल गांधी (वय-40 रा. पालघर), कल्पेश बी पांड्या (वय-43 रा. अहमदाबाद, गुजरात), सुरेंद्र यशवंत दिवाडकर (वय-50 रा. पालघर), चालक विवेक भास्कर नलावडे (वय-53 रा. मुंबई), अलीपीर मोहम्मद (वय-27 रा. दिल्ली), इम्रान सराफत खान (वय-20 रा. भाईंदर, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडे कसून चौकशी सुरु आहे.
समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्री नाकाबंदी सुरु असताना रात्री साडे अकराच्या सुमारास एक कार ग्रोव्हेल्स मॉलच्या समोर असलेल्या सर्व्हिस रोडवर पोलिसांनी दिसली. त्यामधे बसलेल्या अमित सेठ याचे वागणे संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी कारची झडती घेतली. त्यावेळी सेठकडे असलेल्या बॅगेत मोठ्या प्रमाणात 500 आणि 2000 रुपयांच्या नोटा आढळून आल्या. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी नाईक आणि त्यांच्या पथकाला पोलीस निरीक्षक राज कसबा यांनी माहिती दिली.

निवडणूक निर्णय अधिकारी नाईक आणि त्यांच्या पथकाने रोकड तपासली असता ती रक्कम 1 कोटी रुपये असल्याचे उघड झाले आहे. आरोपींनी पैसे कुठून आणि कोणासाठी आणले याबाबत पोलीस चौकशी करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रादेशिक विभाग मुंबई दिलीप सावंत, परिमंडळ -१२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, समतानगर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजु कसबे, महिला पोलीस निरीक्षक वसावे, सहायक पोलीस निरीक्षक म्हत्रे, रासकर, पोलीस हवालदार संजय मोरे, कोलासे, सावंत, पाटणे, गायकवाड, सुर्य़वंशी, गळणे यांच्या पथखाने केली आहे.

Visit : Policenama.com