‘भाजप मजेशीर पक्ष, नेते सोडून PAला उमेदवारी’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर ‘निशाणा’

औसा : पोलीसनामा ऑनलाईन – भाजप हा खूप मजेशीर पक्ष आहे. नेते सोडून पीएला उमेदवारी देतो. अशी उपहासात्मक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यात औसा विधानसभा मतदारसंघात लामजना येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.

भाजपवर टीका करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की,’ भाजप हा खूप गमतीदार पक्ष आहे. पक्षातील एकनाथ खडसे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकिट कापले. हे तिघेही मंत्रिमंडळात मोठे मंत्री होते. त्यांना तिकिट दिलं नाही आणि पीएला मात्र तिकिट देण्यात आलं. भाजपनं तिकिट देण्यात चूक केली असेल. पण, जनता त्यांना निवडून देण्यात चूक करणार नाही. ‘तसेच येत्या 13 ऑक्टोबरला औसा येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार असल्याची माहितीही बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

लातूर जिल्ह्यातील औसा विधानसभा मतदारसंघातून भाजपनं अभिमन्यू पवार यांना उमेदवारी दिली आहे. अभिमन्यू पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक आहेत. गेल्या 15 वर्षांपासून अभिमन्यू पवार भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत काम करत आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसने बसवराज पाटील यांना उमेदवारी दिली आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बसवराज पाटील यांनी शिवसेनेच्या दिनकर मानेंवर जवळपास नऊ हजार मतांनी विजय मिळविला होता. तर भाजपचे उमेदवार पाशा पटेल यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते.

visit : Policenama.com