चंद्रकांत पाटलांना अडचणीत आणण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनं घेतला मोठा निर्णय, राज ठाकरेंच्या पुण्यात 2 सभा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुण्यातील कोथरूड मतदारसंघात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतर्फे अद्यापही कोणाचेही नाव समोर आलेले नाही. अर्ज भरण्यासाठी आता केवळ पाच-सहा तासच शिल्लक राहिले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याविरुद्ध मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटील आणि किशोर शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेला पाठिंबा जाहीर केला आहे.

भाजपविरुद्ध मनसे थेट लढत –

कोथरूड मतदार संघात उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या किशोर शिंदे यांच्यावतीने आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील त्यांच्याविरोधात विरोधकांचा सर्वमान्य एक उमेदवार असावा यासाठी मनसे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी प्रयत्नशील आहे. अद्यापपर्यंत राष्ट्रवादीने कोथरूड मतदारसंघात उमेदवार दिला नाही. त्यामुळे किशोर शिंदे हेच विरोधकांचे सर्वमान्य उमेदवार ठरणार आहेत. त्यामुळे कोथरूडमध्ये भाजपविरुद्ध मनसे अशी थेट लढत होईल.

भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी राज ठाकरे प्रयत्नशील –

चंद्रकांत पाटील आतापर्यंत विधान परिषदेवरच निवडून येत होते. परंतु, जनतेतून निवडून आल्याशिवाय मंत्रिपद नाही या मोदी-शाह स्ट्रॅटर्जीमुळे चंद्रकांत पाटलांना विधानसभेच्या निवडणुकीला उभे रहावे लागले आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचा बालेकिल्ला आणि सर्वात सुरक्षित मतदारसंघ अशी ओळख असलेल्या कोथरूड मतदार संघाची निवड केली आहे. भाजपच्या या किल्ल्यालाला सुरुंग लावण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रयत्नशील आहेत. राज ठाकरे यांच्या दोन सभा पुण्यात होणार आहेत.

visit : Policenama.com